बडतर्फ पोलिस प्रशिक्षणार्थी ड्रग्ज प्रकरणात गजाआड
अमलीपदार्थ विरोधी पथकाची वागातोर, हरमलात कारवाई : दोन्ही घटनांत दोघांकडून तब्बल 10.98 लाखांचे ड्रग्ज जप्त
पणजी : गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) गोपनीय माहितीच्या आधारे वागातोर आणि हरमल या ठिकाणी छापे मारुन ड्रग्ज तस्करी रोखली. वागातोर येथील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस करण गोवेकर याच्याकडून 8.98 लाख रुपयांचा अमलीपदार्थ जप्त करून त्याला अटक केली आहे. तर हरमल येथील कारवाईत अन्य एका युवकाकडून सुमारे 2 लाखांचा चरस जप्त केला आहे. दोन्ही प्रकरणात मिळून 10.98 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून ड्रग्सची विक्री करण्यासाठी वापरलेली वाहनेही जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमलीपदार्थ विरोधी पथक गेल्या काही दिवसांपासून वागातोर आणि जवळपासच्या भागात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या मागावर होते. हणजुण येथील अटक केलेल्या व्यक्तीला पोलिसांच्या तपासाचा सुगावा लागल्याने त्याने गोपनीय पद्धतीने काम सुरू ठेवले होते. करण गोवेकर हा वागातोर येथे ग्राहकाला अमलीपदार्थ देण्यास येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत गोवेकर याची गाडी अडवून त्याच्याकडील सुमारे 8.98 लाख ऊपयांचा अमलीपदार्थ जप्त करुन करण गोवेकर (वय 32, रा. हणजूण) याला अटक केली. अटक करण्यात आलेला गोवेकर हा बडतर्फ प्रशिक्षणार्थी पोलिस असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
हरमल येथे कारवाई करताना बेस्ताव रॉड्रिगज (28, हरमल) या युवकाकडून 2 लाखांचा 200 ग्रॅम चरस जप्त करून त्यास अटक करण्यात आली. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत त्याच्यावर अमलीपदार्थ विरोधी कायद्या अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीनदयाल रेडकर करत आहेत. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन दिवसांत धडक कारवाई करून दोन ठिकाणी छापे टाकले. एएनसीचे अधीक्षक टिकम सिंह वर्मा, उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सजीत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
विनयभंगामुळे बडर्फ झाला होता करण
पोलिसांनी अटक केलेला करण गोवेकर हा बडतर्फ करण्यात आलेला प्रशिक्षणार्थी पोलिस आहे. त्याला अटक करताना पथकाने त्याच्याकडून 37 ग्रॅम कोकेन, 37 ग्रॅम मेथाम्फेटामाइन आणि 15 ग्रॅम उच्च दर्जाच्या एक्स्टसी टेबलेट्स जप्त केल्या आहेत. या ड्रग्सची आंतराष्ट्रीय बाजारात 8.98 लाख रुपये इतकी किमत आहे. संशयिताने ड्रग्सची वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार देखील जप्त केली आहे. प्रशिक्षणावेळी त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्याने त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.