मनपाची लेखा स्थायी समिती बैठक बरखास्त
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सदस्य गेले निघून : महापालिकेवर नामुष्की
प्रतिनिधी/ बेळगाव
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शनिवारी आयोजित करण्यात आलेली बेळगाव महानगरपालिकेची स्थायी समिती बैठक बरखास्त करावी लागली. स्थायी समितीचे सदस्य शंकर पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत संताप व्यक्त करत बैठकीतून निघून जाणे पसंद केले. यामुळे बैठक बरखास्तीची नामुष्की महानगरपालिकेवर ओढवली.
शनिवारी सकाळी 11.30 वाजता महानगरपालिकेची स्थायी समिती बैठक होणार होती. अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने ही बैठक काही निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 12.15 वाजता सुरू झाली. लेखा स्थायी समितीच्या अध्यक्ष रेश्मा कामकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाकडून देण्यात आलेली बिले मंजुरीसाठी लेखा स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात येतात. परंतु त्या विभागाचे अधिकारी उपस्थित रहात नसल्याने अध्यक्षांसह स्थायी समितीच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. बैठकीला सदस्य सारिका पाटील, प्रिया सातगौंडा, रेश्मा बैरकदार यांसह इतर सदस्य उपस्थित होते.
एकच बिल सलग दोन महिन्यांत वठविल्याने आक्षेप
लेखा स्थायी समितीच्या सदस्यांकडे अहवाल सुपूर्द करण्यात आला. यामध्ये डिसेंबर महिन्यात एका फर्मचे बिल देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु पुन्हा जानेवारी महिन्यात त्याच फर्मला बिल दिल्याचा उल्लेख अहवालात आहे. याबाबत शंकर पाटील यांनी बैठकीत आक्षेप घेतला. यावर उत्तर देताना अधिकाऱ्यांनी हातवर करत एकच बिल कॉपी पेस्ट झाले असावे, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. परंतु या सर्व प्रकारामुळे अधिकाऱ्यांना बैठकीचे गांभीर्य किती आहे, हे दिसून आले.
कारणे दाखवा नोटिसीचे पुढे काय?
मनपातील सर्व कामकाजाला निधीच्या स्वरुपात मंजुरी लेखा स्थायी समितीकडून दिली जाते. परंतु पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीपासून अधिकारीच उपस्थित नसल्याने वेळोवेळी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील वेळेला अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. परंतु या नोटिसीचे पुढे काय झाले? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? असा प्रश्न सदस्य शंकर पाटील यांनी उपस्थित केला.
चुकीची माहिती दिल्याने अधिकाऱ्यांमध्येच जुंपली
स्थायी समितीच्या सदस्यांनी बिल मंजुरीबाबत माहिती मागितली. माहिती देताना कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका यांनी चुकीची माहिती दिली. यामुळे मुख्य लेखा अधिकारी मंजुनाथ बिळगीकर यांनी जोरदार आक्षेप घेत स्थायी समिती सदस्यांना चुकीची माहिती देऊ नका, असा आक्षेप घेतला. यामुळे या दोन अधिकाऱ्यांमध्येच जुंपल्याचे चित्र दिसून आले.
बॉक्सवर 35 हजार...कागदोपत्री 49,500 रुपये!
लॅपटॉप खरेदीतील गोलमाल चव्हाट्यावर
बेळगाव : लॅपटॉप किमतीवरून महापालिकेचे अधिकारी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. लॅपटॉपच्या बॉक्सवर 35 हजार रुपये किंमत असताना एका लॅपटॉपची किंमत कागदोपत्री 49,500 रुपये दाखविण्यात आली आहे. याबाबत लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु, त्यांनाच उलटसुलट उत्तरे देण्यात आल्याने महापालिकेतील कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महापालिकेच्या अनुदानातून 123 विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशाने दरवर्षी लॅपटॉप दिले जातात. लॅपटॉपच्या किमतींमध्ये थोडाफार फेरफार असल्याचे लक्षात आल्याने स्थायी समितीच्या अध्यक्ष रेश्मा कामकर, सदस्य शंकर पाटील, सारिका पाटील यांनी शनिवारी लेखा अधिकाऱ्यांना जाब विचारला. स्थायी समितीच्या बैठकीत योग्य माहिती न मिळाल्याने थेट कार्यालय गाठून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
लॅपटॉपच्या बॉक्सवर 35 हजार रुपये किंमत छापलेली होती. वास्तविक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साहित्याची किंमत छापील किमतीपेक्षा कमी असते. ऑनलाईन किंमत तर त्याहूनही कमी असते. संबंधित लॅपटॉप हा होलसेलरकडे 20 ते 25 हजारांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. परंतु, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका लॅपटॉपची किंमत कागदोपत्री 49,500 रुपये इतकी लावली असल्याचे लक्षात येताच शंकर पाटील यांनी याविरोधात जोरदार आवाज उठविला.