For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धरामय्या, शिवकुमार यांच्यात आज चर्चा

06:12 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिद्धरामय्या  शिवकुमार यांच्यात आज चर्चा
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्य काँग्रेस सरकारमधील मुख्यमंत्रिपद हस्तांतराच्या मुद्द्यावर गोंधळ सुरू असून रविवारपर्यंत त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. काँग्रेसश्रेष्ठींकडून गुरुवारी रात्रीच नवी  कर्नाटकातील अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावर निर्णय घेतला जाणार होता. मात्र वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी विदेश दौऱ्यावर असल्याने त्यांच्या निदर्शनास आणल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली असली तरी कोणताही निर्णय घेतला नाही. दुसरीकडे कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिल्लीला बोलावण्यात येणार आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेवरून उभय नेते शनिवारी सकाळी नाश्त्याच्या निमित्ताने एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. त्यामुळे पुढील घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.

काँग्रेसश्रेष्ठींच्या सूचनेवरून सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्यात चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे बेंगळुरातील शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ येथे ही बैठक होणार आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी स्वत: पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. हायकमांडने आम्हाला अद्याप दिल्लीला बोलावलेले नाही. मात्र, एकमेकांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सकाळी दोघेही नाश्त्यासाठी एकत्र बसून चर्चा करणार आहे. हायकमांडने बोलावले तर जाईन. हायकमांडचा निर्णय मला मान्य आहे, या भूमिकेवर आताही ठाम आहे. शिवकुमार यांनीही हायकमांड जे सांगेल ते मान्य असल्याचे म्हटले आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. वरिष्ठांच्या सूचनेवरून शिवकुमार शनिवारी सकाळी 9:30 वाजता सिद्धरामय्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.

Advertisement

काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी सिद्धरामय्या व शिवकुमार यांना फोन करून एकमेकांशी चर्चा करण्याची सूचना दिली. त्यामुळे उभय नेते शनिवारी सकाळी एकत्र बसून चर्चा करणार आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर सोनिया गांधी खर्गे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला यांच्यात बैठक होईल. या बैठकीतच मुख्यमंत्रिपदाबाबत तोडगा काढला जाणार आहे.

रविवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावून घेतले जाईल. तेथे मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, वेणुगोपाल, सुरजेवाला हे सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्याशी चर्चा करून पक्षाचा निर्णय सांगून वादावर तोडगा काढणार आहेत. दिल्लीला जावे लागणार असल्यामुळे हे दोन्ही शनिवारी चर्चा करतील. रविवारी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय देईल, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

वक्कलिग, अहिंद समुदायांची राजीनाम्याचा इशारा

काँग्रेस हायकमांडने कर्नाटकमधील मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यास विलंब केल्याने पक्षातील राजकीय परिस्थिती आणखी बिघडली आहे. एकीकडे वक्कलिग आणि दुसरीकडे ‘अहिंद’ (अल्पसंल्याक, मागासवर्ग, दलित) समुदायातील आमदारांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री न बनविल्यास वक्कलिग समुदायातील राजीनामा देतील. काँग्रेसला पुढील विधानसभा निवडणुकीत वक्कलिग समुदायाकडून एक मतही मिळणार नाही, असा इशारावजा संदेश हायकमांडला देण्यात आला आहे. याला प्रत्युत्तरदाखल अहिंद समुदायातील संघटना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. नेतृत्वबदल केल्यास अहिंद समुदायातील 80 हून अधिक आमदार राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चार-पाच महिन्यांपासून सरकारमधील नेतृत्वावरून छुपा संघर्ष सुरू होता. आता तो उफाळून आला आहे. मात्र, कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने कोणी काहीही करू शकत नाहीत, अशी हायकमांडची धारणा झाली होती. मात्र, हा वाद पेटला आहे. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या समर्थक मंत्री-आमदारांकडून रणनीती आखली जात आहे.

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील संघर्षात आता आमदारांनी समुदायाच्या प्रभावावरून वरिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. इकडे डी. के. शिवकुमार उघडपणे बोलत नसले तरी ते आपल्या परीने फासे टाकत आहेत. त्यांचे बंधू माजी खासदार डी. के. सुरेश दिल्लीतच ठाण मांडून आहेत. शिवकुमार यांनी आपल्या समर्थकांमार्फत मागील आठवड्यातच वरिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. शिवकुमारांचे पारडे जड होत असतानाच आता सिद्धरामय्या यांच्या गटातील मंत्र्यांकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत.

सोनिया गांधींशी चर्चा

कर्नाटकातील अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावर वातावरण तापले असताना नवी दिल्लीत बैठकांची मालिका यापूर्वीच सुरू झाली आहे. गुरुवारी रात्री बिहार निवडणुकीच्या निकालांवर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीतच खर्गेंनी राहुल गांधींना कर्नाटकातील घडामोडींची माहिती दिली. आता वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर बहुतेक रविवारी या मुद्द्यावर तोडगा काढला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

मला कोणतीही घाई नाही!

मला कोणतीही घाई नाही, सर्वकाही पक्ष निर्णय घेईल. करण्यासारखी बरीच कामे माझ्याकडे आहेत. त्यामुळे दिल्लीला जाऊ शकतो. संसदेची हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून राज्यातील खासदारांची भेट घ्यायची आहे. म्हादई, कृष्णा, एत्तीनहोळे या योजनांबाबत खासदारांशी चर्चा करावयाची आहे.

- डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री

Advertisement
Tags :

.