स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत चर्चा
मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासंदर्भात सोमवारी बैठक पार पडली. आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शंभर स्वच्छता कर्मचारी नेमणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. यावेळी कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहराचा विस्तार वाढत असताना स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे नव्या कामगारांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. यासाठीच सोमवारी सकाळी नियुक्तीसंदर्भात बैठक पार पडली. आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी कामगार कार्यालयाकडून नियुक्ती संदर्भात माहिती जाणून घेतली. शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली असून पुढील कार्यवाही टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. बैठकीला बेळगाव कामगार आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.