For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू-काश्मीर संबंधी दोन विधेयकांवर लोकसभेत चर्चा

06:45 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीर संबंधी दोन विधेयकांवर लोकसभेत चर्चा
Advertisement

तृणमूल खासदारावर बरसले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरशी निगडित दोन विधेयकांवर चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान सत्तारुढ खासदार आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली आहे. चर्चेदरम्यान तृणमूल खासदार सौगत रॉय यांनी केलेल्या टिप्पणीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संताप व्यक्त केला आहे. एका देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज कसे चालू शकतात? पूर्वी जे चालत होते, ते चुकीचे होते. ज्यांनी हे सर्व काही केले, तेच चुकीचे होते. परंतु पंतप्रधान मोदींनी ही चूक दुरुस्त केल्याचे शाह यांनी रॉय यांना सुनावले आहे.

Advertisement

आम्ही 1950 पासून ‘एक प्रधान, एक निशान, एक विधान’ असावे असे म्हणत आहोत. हा काही राजकीय नारा नाही. आम्ही या तत्वावर दृढपणे विश्वास ठेवून आहोत. आम्ही हे अखेर करून देखील दाखविले आहे. सौगत रॉय यांनी चर्चेदरम्यान केलेली टिप्पणी आक्षेपार्ह होती. तुमची सहमती किंवा असहमती महत्त्वाची नाही. जे आम्ही केले, ते पूर्ण देश इच्छित होता असे शाह यांनी रॉय यांना सुनावले आहे.

तृणमूल खासदाराने श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा उल्लेख केला, मग त्यांच्या बलिदानाचे स्मरणही करायला हवे होते असे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. चर्चेदरम्यान खासदार रॉय यांनी आपण श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव असलेल्या महाविद्यालयात शिकलो होतो असे म्हणत  ‘एक निशान, एक प्रधान, एक संविधान’ हा त्यांचा नारा राजकीय होता अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती.

हिवाळी अधिवेशनात लोकसभेत जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023 वर चर्चा होत आहे. पूर्वी काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना घडत होत्या. परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अशाप्रकारच्या घटना घडत नाहीत. आता केवळ लाल चौकातच नव्हे तर काश्मीरच्या प्रत्येक गल्लीत भारताचा ध्वज फडकविला जात असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.