चार राज्यांतील रेल्वेसंदर्भातील समस्यांबाबत चर्चा
कोकण रेल्वे युजर्स समालोचन समितीची मडगाव येथे बैठक
कारवार : मडगाव (गोवा) येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण रेल्वे युजर्स समालोचन समिती बैठकीत गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यातील रेल्वेसंदर्भात प्रमुख समस्या आणि मागण्यांच्या बाबतीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी होते. रेल्वे प्रवाशांना अधिक अनुकुल व्हावे या उद्देशाने एसएमव्हीबी मुर्डेश्वर एक्स्प्रेस रेल्वे (रेल्वे क्र. 16585/86) गोव्यातील वास्कोपर्यंत सोडण्यासाठी रेल्वे मंडळाला पुन्हा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रेल्वे सध्या बेंगळूर, मुर्डेश्वर दरम्यान धावत आहे. कारवार मडगाव दरम्यान धावणारी मेमू रेल्वे आता गोव्यातील मडगाव ऐवजी गोव्यातील पेर्णेमपर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मेमू रेल्वे कारवार दरम्यान धावण्याऐवजी कारवार पेर्णेम दरम्यान धावणार असल्याने याचा मोठा लाभ रेल्वे प्रवाशी आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. कारवार, बेंगळूर दरम्यान धावणाऱ्या पंचगंगा एक्स्प्रेस रेल्वेला अतिरिक्त तीन डबे जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सध्या पंचगंगा एक्स्प्रेस रेल्वेच्या डब्यांची संख्या 19 आहे. समितीच्या प्रस्तावाला रेल्वे समितीने हिरवा कंदील दाखविला तर या एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे. डब्यांची संख्या वाढविण्यात आली तर कारवार-बेंगळूर या प्रमुख मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे.
नवीन मोबाईल अॅप्लिकेशन रीलीज
या समितीच्या महत्त्वाच्या बैठकीवेळी कोकण रेल्वे संदर्भात माहिती अधिक सुलभपणे मिळविण्यासाठी साहाय्यक ठरणारे नवीन मोबाईल अॅप्लिकेशन के. आर. मीरर, खासदार विश्वेश्वर हेगडे यांच्या हस्ते रीलीज करण्यात आले. या नवीन अॅपद्वारे प्रवासी रेल्वेची स्थिती, गती, वेळापत्रक आणि अन्य सुविधांबद्दल माहिती मिळणार आहे.
बैठकीला 8 खासदारांची उपस्थिती
बैठकीत कारवार जिल्ह्यातील रेल्वे प्रवासासंदर्भातही चर्चा करण्यात आली. बैठकीला कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्यासह एकूण आठ खासदार उपस्थित होते. बैठकीवेळी कारवार जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म शेल्टर आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या.