उत्तर कर्नाटक विकासावर विधानपरिषदेत चर्चा
बेळगाव : हिवाळी अधिवेशनात बुधवारचा दिवस उत्तर कर्नाटकाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार बुधवार (आज) विधानपरिषदेत उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा करण्यात येणार आहे. मंगळवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी व आमदार सी. टी. रवी यांनी उत्तर कर्नाटकाच्या विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक सभागृहाला खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी खोटी माहिती न देता योग्य माहिती देऊन सरकारच्याही निदर्शनास आणून द्यावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.
यावेळी काहीकाळ मोठ्या प्रमाणात सत्ताधारी व विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. चलवादी नारायणस्वामी यांनी उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकारने पीक नुकसानीचा सर्व्हे केला असला तरी आम्हीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व्हे केला आहे, असे त्यांनी सांगितले. यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत भाजपने कोणत्या आधारावर सर्व्हे केला, असा प्रतिप्रश्न सभागृह नेते बोसराजू यांनी उपस्थित केला. यावेळी सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.