जात जनगणनासह महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मंत्र्यांची बैठक
प्रतिनिधी/ बेंगळूर
जात जनगणना अहवाल, अंतर्गत आरक्षण, पोटनिवडणूक यासह चालू घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी सर्व मंत्र्यांसोबत डिनर पार्टीची बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकारी निवासस्थान कावेरी येथे मंत्र्यांची बैठक पार पडली असून जात जनगणना अहवालाची अंमलबजावणी आणि अंतर्गत आरक्षण, पोटनिवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत जात जनगणना अहवालाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी रविवारी लिंगायत आणि वक्कलिगा समाजाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन जात जनगणना अहवालाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अंतर्गत आरक्षणाबाबत शनिवारी अनुसूचित समाजातील मंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी सायंकाळी सर्व मंत्र्यांची बैठक झाली.
तिन्ही मतदारसंघात आमच्या पक्षाचे उमेदवार विजयी होण्याची शक्मयता जास्त आहे. त्यामुळे सर्वांनी उमेदवाराच्या विजयासाठी परिश्रम घेतले पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत भाजपमधील प्रत्येकजण खोटे बोलतो. त्यांचा खोटारडेपणा जनतेसमोर आला पाहिजे. पोटनिवडणुका संपेपर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर वाढतच राहणार आहे. तिन्ही मतदारसंघांच्या पोटनिवडणुका अतिशय महत्त्वाच्या असून तिन्ही जागा जिंकायला हव्यात. यासाठी प्रत्येकाने आपापल्या सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या पाहिजेत, अशा विविध सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना केली आहे.