अबकारी अधिकाऱ्यांकडून ‘मंथली मनी’
लाच घेण्यात येत असल्याचा मद्यविक्रेत्यांचा आरोप : 20 नोव्हेंबरला राज्यव्यापी ‘बंद‘
प्रतिनिधी/ बेंगळूर
वाल्मिकी विकास निगम आणि मुडाच्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारची कोंडी झाली आहे. दरम्यान, अबकारी खात्यातील अधिकारी मद्य दुकानदारांकडून ‘मंथली मनी’च्या नावाने लाच घेत असल्याचा आरोप झाला आहे. अबकारी अधिकारी मद्य विक्रेत्यांकडून दर महिन्याला पैसे वसूल करत असल्याचा आरोप कर्नाटक वाईन मर्चंट असोसिएशनने केला आहे. खात्यातील या भ्रष्टाचाराविरुद्ध 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मद्यविक्री बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाच, बेकायदेशीरपणे परवान्याचे नूतनीकरण यासह अबकारी खात्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आहे. याच्या निषेधार्थ कर्नाटक वाईन मर्चंट असोसिएशनने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील मद्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. असोसिएशनने राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्रात अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्याविरुद्धही तक्रार करत त्यांचे खाते बदलण्याची विनंती करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करून काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना असोसिएशनने पत्र लिहिले होते. आता भ्रष्टाचाराविषयी तक्रार करून ‘बंद’चा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांकडून दरमहा वसुलीची व्यवस्था खात्यामध्ये असल्याचे मद्य विक्रेत्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. बदल्या आणि बढतीसाठी अधिकाऱ्यांनी लाखो रुपये लाच दिली आहे. त्यामुळे ते मद्य विक्रेत्यांकडून मनमानी लाच वसूल करत आहेत. परिणामी राज्यात बनावट मद्याचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप आहे.
बेंगळूर शहर हद्दीत कार्यरत असलेल्या अबकारी निरीक्षकांकडून प्रत्येकी 40 लाख रुपये आणि बेंगळूरबाहेर कार्यरत असलेल्या अबकारी निरीक्षकांकडून 25 लाख रुपये वसूल केले जात आहे. 18 कोटी रु. जमा करण्यात आले असून त्यातील मोठा वाटा मंत्री तिम्मापूर यांना मिळाल्याचा आरोप मद्य विक्रेत्यांनी केला आहे.
काँग्रेस सरकारचा आणखी एक चेहरा उघड : आर. अशोक
अबकारी खात्याकडून वसुली होत असल्याचा आरोप होताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करून सरकारवर जोरदार टीका केली आहे. अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेस सरकारचा आणखी एक चेहरा उघड झाला आहे. राज्य मद्यविक्रेते संघटनेने मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात अबकारी मंत्री ‘मंथली मनी’च्या नावाने मद्य दुकानदारांकडून दरमहा 15 कोटी रु. प्रमाणे वर्षाला 180 कोटी रु. लाच घेत असून तिम्मापूर यांचे खाते बदल करण्याची विनंती केली आहे, असेही आर. अशोक म्हणाले.