For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एससीओ’ मध्ये महत्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा शक्य

07:00 AM Sep 16, 2022 IST | Tarun Bharat Portal
‘एससीओ’ मध्ये महत्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा शक्य
Advertisement

पंतप्रधान मोदी परिषदेसाठी समरकंदकडे, चीनच्या अध्यक्षांना भेटण्याची शक्यता

Advertisement

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आज शुक्रवारपासून  एससीओ (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) परिषदेला प्रारंभ होत आहे. या परिषदेत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे जात आहेत. या परिषदेत सदस्यदेशांमधील सहकार्य, विभागीय मुद्दे तसेच संघटनेचा विस्तार यासंबंधी व्यापक चर्चा होईल अशी भारताला अपेक्षा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

Advertisement

या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही भेटतील अशी शक्यता आहे. यासंबंधी अद्याप अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली नसली तरी योग्य वेळी  माहिती देण्यात येईल असे विदेश विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

विभागीय सुरक्षेवर चर्चा

या परिषदेत मुख्यतः विभागीय सुरक्षेच्या मुद्दय़ावर चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे संघटनेच्या सदस्य देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वृद्धी करण्यासंबंधीही चर्चा होईल. संघटनेचा पाया बळकट करण्यासाठी संघटनेचा विस्तार आवश्यक आहे या मुद्दय़ावर भारत भर देणार आहे. पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे पंतप्रधान शावकत मिर्झियोयेव्ह यांच्याशीही द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

भारतासाठी महत्वाची संघटना

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही भारतासाठी महत्वाची संघटना आहे, हे पंतप्रधान मोदींच्या सहभागावरुन स्पष्ट होते, असे प्रतिपादन विदेश व्यवहार विभागाने केले आहे. त्यांचे समरकंद येथे वास्तव साधारणतः 24 तास इतके असेल. या काळात त्यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत.

युपेन युद्धही मुद्दा

या परिषदेत युक्रेनच्या मुद्दय़ावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात बरेच बदल घडले असून काही नकारात्मक बाबीही घडल्या आहेत. त्यामुळे हा विषय टाळता येणार नाही. रशिया हा या संघटनेचा महत्वाचा सदस्य देश आहे. भारताने आजवर युक्रेन युद्धात कोणाचीही बाजू घेण्याचे टाळले आहे. पंतप्रधान मोदी या परिषदेच्या निमित्ताने इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैसी यांचीही भेट घेतील असे वृत्त रशियन आणि इराणी मिडियाने दिले आहे.

Advertisement
Tags :

.