चर्चा हाच समस्या सोडविण्याचा मार्ग !
आसियान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, संघटनेच्या एकतेवर दिला भर
वृत्तसंस्था / व्हिअनतियाने (लाओस)
‘युद्धाच्या किंवा सशस्त्र संघर्षाच्या मार्गाने कोणतीही समस्या सुटणार नसून शांततामय चर्चा हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान शिखर परिषदेतील भाषणात केले आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आसियान देशांमधील एकजुटीला भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे. सध्या जगात विविध स्थानी अनेक संघर्ष होत असून त्यांचा सर्वात वाईट परिणाम दक्षिण गोलार्धातील देशांवर होत आहे. त्यामुळे हे संघर्ष थांबण्याची आवश्यकता असून हे युद्धाचे जग नाही, असाही संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
आसियान देशांची शिखर परिषद लाओस येथील व्हिअनतियाने येथे पार पडली. या दोन दिवशीय परिषदेचा प्रारंभ गुरुवारी झाला होता. भारत या परिषदेचा अतिथी देश आहे. भारतासमवेत या परिषदेत अमेरिका आणि चीन यांचे प्रतिनिधीही समाविष्ट झाले होते. या परिषदेत अनेक जागतिक आणि प्रादेशिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या विषयांमध्ये आसियान देशांमधील परस्पर संबंध, भारत-प्रशांतीय प्रदेशातील परिस्थिती, जगात विविध ठिकाणी चाललेले संघर्ष आणि त्यांचे परिणाम, आसियान परिषदेची आजवरची कामगिरी आणि भविष्यातील योजना इत्यादींचा समावेश करण्यात आला होता.
पूर्वेकडे पहा धोरणाची 10 वर्षे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारताने 2014 मध्ये पूर्वेकडे पहा या धोरणाचा स्वीकार केला होता. या धोरणाला आता 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये पूर्वेकडील देशांशी भारताचे संबंध मोठ्या प्रमाणात सुधारले आहेत. भारत आणि या देशांमधील आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारत आसियान देशांच्या एकतेसाठी प्रतिबद्ध असून हे सर्व देश एकत्र राहिल्यास जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जपानशी द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेच्या निमित्ताने जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्यासह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने पायाभूत सुविधा विकास, सेमीकंडक्टर निर्मिती, कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये विकास करण्याची योजना सज्ज करीत आहेत. भारताला या सहकार्याचा विशेष लाभ होणार आहे, अशी माहिती या चर्चेनंतर देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन यांच्याशीही चर्चा करुन त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, दुग्धव्यवसाय, अंतरिक्ष आणि पर्यटन या विषयांमध्ये सहकार्यावर या चर्चेत भर देण्यात आला होता.
म्यानमारवर चर्चा
म्यानमार या देशात सध्या गृहयुद्ध होत आहे. 2021 मध्ये म्यानमारच्या सेनेने सान सू की यांचे सरकार उलथविले होते. त्यानंतर तेथे सातत्याने यादवी होत असून या यादवीत आतापर्यंत 6 हजार लोक मारले गेले आहेत. तसेच 30 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. आसियान देशांच्या दृष्टीने ही चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे या विषयावर परिषदेत चर्चा करण्यात आली.
आसियानमध्ये 10 देश
आसियान संघटनेची स्थापना 1967 मध्ये थायलंडची राजधानी बँकॉक येथे झाली होती. इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, म्यानमार, कंबोडिया, ब्रुनेई आणि लाओस अशा 10 देशांचा या संघटनेत समावेश आहे. भारत, चीन, अमेरिका इत्यादी देशांना अतिथी देश म्हणून स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे या देशांचे नेतेही या संघटनेच्या परिषदांमध्ये सहभागी होतात. संरक्षण, अर्थ आणि व्यापार यांना प्राधान्य देणारी ही संघटना आहे.