कोरोनाबाबत स्थायी समिती बैठकीत चर्चा
ट्रेड लायसेन्सबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना : भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याचा आदेश
बेळगाव : कोरोना पुन्हा सक्रिय होत आहे. त्यामुळे आता चाचणी करण्यावर भर दिली जाणार आहे. अद्याप किट आले नाहीत. मात्र किट आल्यानंतर या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी सांगितले. शिक्षण व आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. चेअरमन रवी धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी ट्रेड लायसेन्स अजूनही 10 हजार जणांनी घेतल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही नेमके काम काय करता? असा प्रश्न त्यांनी आरोग्याधिकाऱ्यांना विचारला. केवळ लहान हॉटेल्स व टपरीवाल्यांना दंड घेऊ नका तर शहरातील मोठ्या हॉटेल्समध्येही अस्वच्छता आहे. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी सूचना रवी धोत्रे यांनी आरोग्याधिकाऱ्यांना केली. प्रथम नोटीस द्या, गरिबांना दंड लावू नका, असेही त्यांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी कुत्र्यांवर जास्तीतजास्त शस्त्रक्रिया करण्यासाठी पाऊल उचला. स्वतंत्र इमारत उभी करून त्या ठिकाणी कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करावी, असे सांगण्यात आले. तुरमुरी डेपोच्या परिसरातच सध्या असलेल्या इमारतीमध्ये कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगण्यात आले. रुक्मिणीनगर येथे सध्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र यामुळे या परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, अशी नगरसेवकांनी तक्रार केली. त्यावर त्यांनी वरील सूचना केली. कोरोनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीच काळजी घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आता मास्क वापरण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोविड चाचणी करण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे, असे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी विविध वृत्तपत्रांमध्ये माहिती प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना करण्यात आली आहे. काही मोजक्याच माध्यमांना जाहिराती दिल्या जात आहेत. मात्र असे न करता जास्तीत जास्त वृत्तपत्रांना जाहिराती देण्यासाठी प्रयत्न करा, असे रवी धोत्रे यांनी यावेळी सांगितले.
अगरबत्ती प्रकल्पाबाबत जोरदार चर्चा
अगरबत्ती प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर ते बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याबाबत काही नगरसेवकांनी पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांना विचारले असता गुरुवारी आम्ही त्या ठिकाणी अगरबत्ती उत्पादनाची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले. याबाबत काही नगरसेवकांनी या प्रकल्पासाठी पुरस्कार मिळाला. मात्र तो बंद असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. काही नगरसेवकांनी मात्र याबाबत मूग गिळणेच पसंत केले. या प्रकल्पासाठी 5 लाख खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भविष्यात सुरू राहील, याची शाश्वती नसल्याची चर्चादेखील झाली.
फॉगिंग मशीन खरेदी करूनही वापर नाही
फॉगिंग मशिन खरेदी केल्या आहेत. मात्र शहरामध्ये अजूनही प्रभागांमध्ये फवारणी केली जात नाही. याबाबत विचारले असता एकमेकांकडे बोट करण्यातच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी धन्यता मानली. लाखो रुपये खर्च करून फॉगिंग मशिन घेण्यात आल्या. मात्र त्याचा उपयोगच अद्याप झाला नाही. यामुळे नगरसेवकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
आरोग्य निरीक्षकांचे अभिनंदन अन् कौतुक...
हिवाळी अधिवेशनाच्या काळात शहरातील स्वच्छता राखण्यासाठी तसेच सुवर्णसौध परिसरातील स्वच्छता केली होती. याबद्दल नगरविकास मंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. याबद्दल या स्थायी समितीच्या बैठकीतही आरोग्य निरीक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. शिक्षण व आरोग्य स्थायी समितीच्या या बैठकीला सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी यांच्यासह महापालिका उपायुक्त उदयकुमार तळवार, अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, कायदा सल्लागार महांतशेट्टी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.