पंख असलेल्या देवतेच्या मूर्तीचा शोध
मानव-बैल-पक्ष्याचे शरीर
इराकमध्ये पुरातत्व तज्ञांना उत्खननादरम्यान 2700 वर्षे जुनी मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती पंख असलेली असीरियन देवता लामासूची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मूर्ती अत्यंत मोठी असून चांगल्या अवस्थेत आहे, परंतु याचे शीर गायब आहे. लामासु देवतेचे शरीर मानव, बैल आणि पक्ष्याच्या मिश्रणाने तयार झालेले होते.
पंख असलेली असीरियन देवता लामासुची मूर्ती उत्तर इराकमध्ये आढळून आली आहे. ही मूर्ती अलाबस्टरने तयार झालेली असून ते एकप्रकारचे जिप्सम आहे. याचा वापर मूर्ती, फुलदाणी आणि इतर सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो.
पुरातत्व तज्ञांना ही मूर्ती चांगल्या अवस्थेत तुकड्यांमध्ये मिळाली आहे. या विशाल मूर्तीचे केवळ शीर गायब असून ते यापूर्वीच बगदाद येथील इराक संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहे. 1990 च्या दशकात कस्टम ऑफिसर्सनी तस्करांकडून हे शीर जप्त केले होते.
स्वत:च्या आयुष्यात इतकी मोठी गोष्ट कधी शोधली नव्हती. या मूर्तीचे वजन 18 टन असून आकार 3.8 गुणिले 3.9 मीटर इतका आहे. सर्वसाधारणपणे इजिप्त किंवा कंबोडियातच इतके मोठे तुकडे आढळून येतात असे उत्खननाचे नेतृत्व करणारे फ्रेंच पुरातत्व तज्ञ पास्कल बटरलिन यांनी सांगितले आहे. बटरलिन हे पॅरिस विद्यापीठ पँथियन-सोरबोनमध्ये मध्यपूर्व पुरातत्व विभागाचे प्राध्यापक आहेत.
ही मूर्ती प्राचीन शहर खोरसाबादच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आली होती. ही मूर्ती लोमासु देवतेची असून मानवी शीर, बैलाचे शरीर आणि पक्ष्याचे पंख असलेली ही असीरियन देवता आहे. ही मूर्ती राजा सर्गोन द्वितीयच्या शासनकाळात तयार करण्यात आली होती. त्यांनी ख्रिस्तपूर्व 722 पासून ख्रिस्तपूर्व 705 पर्यंत राज्य केले होते. असीरियन राजधानीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी शहराच्या द्वारावर याची निर्मिती करण्यात आली होती अशी माहिती बटरलिन यांनी दिली आहे.