For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन

12:24 PM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन
Advertisement

बेळगाव : विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बेळगावच्यावतीने रविवारी पथसंचलन करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागातून शिस्तबद्धरीत्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पथसंचलन सादर करण्यात आले. यानिमित्त शहरात सर्वत्र रांगोळ्या तसेच स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. सरदार्स मैदान येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चव्हाट गल्ली, भडकल गल्ली, खडक गल्ली, काकतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, लिंगराज कॉलेज चौक येथून लिंगराज मैदानावर संचलनाची सांगता झाली. संचलन मार्गावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती तसेच स्वागतकमानी जागोजागी उभारण्यात आल्या होत्या.

Advertisement

पथसंचलनाचे स्वागत करण्यासाठी शालेय विद्यार्थी महापुरुषांच्या वेशात उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीनुसार व तालबद्धरीत्या पथसंचलन करण्यात आले. यामध्ये बेळगाव परिसरातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे निवृत्त पोलीस महासंचालक व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष शंकर बिदरी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री गोपाळ यांनी मार्गदर्शन केले. लिंगराज कॉलेज येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना गोपाळजी म्हणाले, देशाला प्रगतीच्या वाटेवर न्यायचे असेल तर सर्व हिंदू एकत्र आले पाहिजेत. भाषा हे सौहार्दाचे माध्यम असल्याने कोणताही भेदभाव करून चालणार नाही. कर्नाटकात अनेक दंगली उफाळत असून केवळ एकाच समाजावर कारवाई होते. दुसऱ्या समाजावर कोणतीच कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हे प्रकार वेळीच रोखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.