कद्रा जलाशयातून 67 हजार क्युसेकसचा विसर्ग
कारवार : जिल्ह्यातील किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यांना मुसळधार पाऊस झोडपून काढीत आहेत. तर घाटमाथ्यावरील शिरसी, सिद्धापूर तालुक्यानाही दमदार पाऊस पडत आहे. किनारपट्टीवर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची मालीका सुरूच आहे. आज गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 1 हजार 67 मि.मी. आणि सरासरी 89 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अंकोला तालुक्यात 199 मि.मी., भटकळ 120 मी. मी., होन्नावर 112 मि.मी. कारवार, 121 मि.मी. आणि कुमठा तालुक्यात 144 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टीवरील कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे काल बुधवारी आणि आज गुरूवारी अंकोला, कारवार, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यातील शाळा पदवीपूर्व महाविद्यालये आयटीआय आणि डीप्लोमा कॉलेजना सुट्टी देण्यात आली होती. गेल्या वीस दिवसात किनारपट्टीवरील तालुक्यातील शाळांना सातत्याने सुट्टी द्यावी लागत असल्यामुळे शिक्षण क्षेत्राची फार मोठी हानी होत आहे. किनारपट्टीवर संपूर्ण जुलै महिना जोरदार पुर्वजनवृष्टी होत असल्यामुळे शेती व्यवसायाची प्रचंड हानी झाली आहे.
कद्रा जलाशयातून 67000 क्युसेकस विसर्ग
कारवार तालुक्यातील काळी नदीवरील कद्रा धरणातून 67 हजार क्युसेकसचा विसर्ग काळी नदीच्या पात्रात करण्यात येत आहे. शिवाय कारवार तालुक्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरूच आहे. त्यामुळे कारवार तालुक्यातील अनेक गावावर पूराची टांगती तलवार लोंबकळत आहे. कारवार तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. असून तालूक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्याकडून गीरसप्पा धरणाची पाहणी
कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी आज गुरूवारी होन्नावर तालुक्यातील शरावती नदीवरील गीरसप्पा धरणाची पाहणी केली. गीरसप्पा धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. आजमितीला तर मर्यादित विसर्ग सुरू आहे. गीरसप्पा धरणातून 50 हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला तर होन्नावर तालुक्यातील 50 कुटुंबांना 70 हजार क्युसेकस विसर्ग करण्यात आला. तर 986 कुटुंबाना आणि एक लाख क्युसेकस विसर्ग करण्यात आला तर साडेतीन हजार कुटुंबांना फटका बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सात तालुक्यातील शाळांना आज सुटी
कारवार तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर शुक्रवार दि. 2 रोजी कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, दांडेली आणि जोयडा या सात तालुक्यातील शाळा, पदवीपूर्व महाविद्यालयांना सुटी देण्यात आल्याची माहिती कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी दिली आहे.