प्रतीक्षेतील रेशनकार्ड लाभार्थ्यांचा अपेक्षाभंग
आचारसंहितेचा ब्रेक : कामाला स्थगिती : लाभार्थी कार्डपासून वंचित
बेळगाव : अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनीयप्पा यांनी 1 एप्रिलपासून नव्या रेशनकार्डचे काम सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, लोकसभेसाठी आचारसंहिता सुरू झाल्याने रेशनकार्डचे काम कसे सुरू होणार? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडू लागला आहे. शिवाय रेशनकार्डाबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषत: लाभार्थ्यांना शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मागील कित्येक दिवसांपासून रेशनकार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. मागील दोन वर्षांपासून नवीन रेशनकार्डसाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान आज, उद्या रेशनकार्ड हातात पडेल, या अपेक्षेत राहिलेल्या लाभार्थ्यांच्या पदरात केवळ प्रतीक्षाच राहिली आहे. दरम्यान, मंत्री मुनीयप्पा यांनी 1 एप्रिलपासून रेशनकार्डचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीमुळे या आश्वासनालाही ब्रेक लागला आहे. लाभार्थ्यांना निवडणूक संपेपर्यंत नवीन रेशनकार्ड मिळणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापैकी गृहलक्ष्मीसाठी रेशनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक 2 हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे रेशनकार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, रेशनकार्डचे काम अनियमित झाले आहे. आता तर आचारसंहितेमुळे या कामाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे रेशनकार्डसाठी निवडणूक संपेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत सद्यस्थितीत माणसी 5 किलो तांदुळ वितरित केले जात आहेत. त्याबरोबरच सरकारमार्फत दरमहा माणसी 170 रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे रेशनकार्डची मागणी वाढू लागली आहे. मात्र खात्याकडून नवीन रेशनकार्डची अर्ज स्वीकृती थांबविली आहे. नवीन रेशनकार्डचे वितरणही थांबले आहे. निवडणुकीमुळे हे काम पुन्हा रेंगाळले आहे. त्यामुळे निवडणूक संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.
आदेशाची प्रतीक्षा
शासनाकडून नवीन रेशनकार्डच्या कामासाठी कोणताही आदेश आला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत रेशनकार्डचे काम बंद आहे. आदेश आल्यानंतर रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ होणार आहे. सध्या निवडणुकीमुळे या कामाला स्थगिती मिळाली आहे.
- श्रीशैल कंकणवाडी, सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते