विष्णू, बलराज, तुलिका यांच्याकडून निराशा
वृत्तसंस्था/ पॅरिस
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणारा सेलर विष्णू सरवननने पुरुषांच्या डिंघी शर्यतीत पहिल्या दिवशी दुसऱ्या रेसनंतर 34 वे स्थान मिळविले. याशिवाय महिला ज्युडोका तुलिका मान, रोवर बलराज पन्वर यांचे आव्हानही संपुष्टात आले.
पहिल्या रेसमध्ये 43 स्पर्धकांनी भाग घेतला होता, त्यात विष्णूने 10 रेस गुण घेत दहावा क्रमांक मिळविला. मात्र दुसऱ्या रेसनंतर 34 रेस गुण घेत 34 व्या स्थानावर त्याची घसरण झाली. दहाव्या रेसनंतर पहिले दहा क्रमांक मिळविणाऱ्या बोट्स पदकाच्या फेरीसाठी पात्र ठरतील. गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने डिंघीमध्ये कोटा मिळविला होता. गेल्या हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विष्णू सरवननने कांस्यपदक मिळविले होते. महिलांच्या डिंघी बोट शर्यतीत भारताच्या नेत्र कुमाननने पहिल्या रेसनंतर 6 गुणांसह सहावे स्थान मिळविले.
ज्युडोका तुलिका मान पहिल्याच फेरीत बाहेर
भारतीय ज्युडोका तुलिका मान महिलांच्या 78 किलोवरील गटात पहिल्याच फेरीत केवळ 28 सेकंदात पराभूत झाल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले. क्युबाच्या लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन इदालिस ऑर्टिझने हरविले. 25 वर्षीय तुलिकाने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य मिळविले होते. ऑर्टिझने मात्र चार ऑलिम्पिक पदके जिंकली असून त्यात दोन रौप्य व एका कांस्यपदकाचाही समावेश आहे. ज्युडो भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव स्पर्धक होती.
सिंगल स्कल्स रोईंगमध्ये बलराज 23 वा
भारतीय रोवर बलराज पन्वरची मोहीम 23 वे स्थान मिळवित समाप्त झाली. पुरुषांच्या सिंगल स्कल्स प्रकारात शेवटच्या डी राऊंडमध्ये पाचवे स्थान मिळविले. हरयाणाच्या 25 वर्षीय बलराजने 7:02.37 वेळ नोंदवली. ऑलिम्पिकमधील त्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मंगळवारी त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या हीटमध्ये पाचवे स्थान मिळविले होते. त्याआधी रेपेचज राऊंडमध्ये त्याने दुसरे स्थान मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. गेल्या शनिवारी त्याने पहिल्या फेरीच्या हीटमध्ये चौथे स्थान घेत रेपेचेज फेरी गाठली होती. फायनल ए मध्ये पहिले तीन स्थान मिळविणाऱ्या स्पर्धकांना पदके दिली जातात.