For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्सची निराशा करणारा जिनपिंग दौरा

06:31 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्सची निराशा करणारा जिनपिंग दौरा
Advertisement

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या आठवड्यात पाच वर्षानंतर प्रथमच युरोपचा दौरा केला. सहा दिवसांच्या या दौऱ्यात भेटीसाठी त्यांनी फ्रान्स, सर्बिया आणि हंगेरी हे मोठ्यापासून छोट्यापर्यंत असे तीन देश निवडले. या निवडीतून अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण केलेल्या जागतिक रचनेस प्रश्नांकित करणे, चीनला तुल्यबळ पर्याय म्हणून पुढे करणे आर्थिक सहकार्यासाठी मैत्रीचा हात पुढे करणे हे प्रमुख हेतू चीनी अध्यक्षाना साधायचे होते.

Advertisement

अमेरिकेच्या प्रभावापासून मुक्त असलेले जग निर्माण करण्याची जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षा आहे. याचाच एक भाग म्हणून युरोप खंडातील देशांचे अमेरिकेशी असलेले पूर्वपार संबंध सैल करायचे आहेत. युक्रेन युद्धात चीनने कायम ठेवलेल्या रशियावादी धोरणाने सारा युरोप आज तणावग्रस्त आहे. जगावर पाळत ठेवणारा देश अशी चीनची प्रतिमा बनली आहे. चीनच्या हेरगिरी कारवाया ज्यामुळे अलीकडेच जर्मनीत चार जणांना अटक झाली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांचा हा युरोप दौरा आखला गेला होता.

या दौऱ्यातून चीन अध्यक्षांना एकीकडे व्यवहारीक सामंजस्य साधायचे होते तर दुसरीकडे युरोप खंडावरील चीनचा प्रभाव दर्शवायचा होता. फ्रान्ससह युरोपातील इतर अनेक देशांचे चीनशी व्यापारी संबंध दिवसेंदिवस वृद्धींगत होत चालले आहेत. अशा स्थितीत जिनपिंग यांची युरोप भेट ही चीन आणि अमेरिका यांच्याशी असलेल्या संबंधाचा तोल नजाकतीने कसा सांभाळावा याबाबत युरोपची एक प्रकारे परीक्षाच पाहणारी होती. कारण कितीही झाले तरी अमेरिकेकडूनच या भेटीकडे आपल्या दोस्त देशांत चीनकडून फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणूनच पाहिले जाणार आहे.

Advertisement

27 सदस्य असलेल्या युरोपियन युनियनच्या अधिकृत तत्त्वप्रणालीत चीनची केलेली व्याख्या मोठी गमतीदार आहे. ‘चीन हा सहकार्यासाठी भागीदार, आर्थिक स्पर्धक आणि प्रणालीजन्य शत्रू’ असे त्यात म्हटले आहे. हा विरोधाभास अशासाठी आहे की, चीनमधील आर्थिक संधी, विकासाच्या शक्यता आणि त्यासोबत येणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक, सायबर सुरक्षा आणि विविध उद्योगांना असणाऱ्या संभाव्य आर्थिक जोखिमा यातील समतोल कसा साधायचा हा पेच युरोपपुढे आहे. युरोपच्या या अवघडलेपणावर टिप्पणी करताना चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी मार्मीक भाष्य केले आहे. ते म्हणाले, अशा स्थितीत चीनला युरोपसह काम करणे कठीण आहे. तुम्ही पुढे जाण्यासाठी वाहन हाकत आहात आणि एका वळणावर लाल, पिवळा व हिरवा हे दिवे एकाचवेळी लागले आहेत. पुढे जाणार तरी कसे? अशा पेचप्रसंगी परस्पर संबंधाचा दिवा हिरवा राखण्यासाठी जिनपिंग यांचे युरोपात आगमन झाले.

या अर्थाने त्यांनी निवडलेला पहिला आणि महत्त्वपूर्ण थांबा फ्रान्स हा देश आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्सचे दिवंगत लोकप्रिय अध्यक्ष चार्ल्स-द-गॉल यांचे एक वचन हल्ली वारंवार वापरले आहे. ते म्हणजे ‘युरोप ही अमेरिकेची जहागीर कधीच बनणार नाही’ मॅक्रॉन यांना युरोपियन युनियनचे अस्तित्व हे राजनैतिक सार्वभौमत्व आणि लष्करी धोरणातील लवचिकता याद्वारे ‘युरोप शक्ती’ उभारण्यावर आहे, असे प्रामाणिकपणे वाटते. चीन आणि अमेरिका यापासून समान अंतर हा समज त्यांना मान्य नाही. अमेरिकेचा जुना मित्र असूनही सारे पर्याय खुले असावेत ही त्यांची धारणा आहे. मॅक्रॉन यांचे हे धोरण जिनपिंग यांना निश्चितच सुखावणारे आहे. एका वर्षापूर्वीच मॅक्रॉन यांचे चीनमध्ये सहर्ष स्वागत करण्यात आले होते. तेथे त्यांनी जागतिक राजनैतिक भागीदारीचा संयुक्त जाहीरनामा प्रसारित केला. गटापासून मुक्त, शीतयुद्ध मानसिकतेतून बाहेर आलेले बहुध्रुविय जग या चीनच्या संकल्पनेस पाठिंबा

दिला.

या पार्श्वभूमीवर गेल्या रविवारी जिनपिंग यांचे फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे आगमन झाले. मात्र मॅक्रॉन यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या त्यांच्या ताफ्यास सुरुवातीसच लालदिव्याचा सामना करावा लागला. तिबेटचे स्वातंत्र्य आणि  मुस्लिमांवरील अत्याचारास आळा घालण्याच्या मागण्या दर्शविणारे फलक घेऊन निदर्शकांनी जिनपिंग यांच्या ताफ्यासमोर मोठ्या संख्येने निदर्शने केली. ताफ्यासमोर तिबेटचा झेंडा फडकावला गेला आणि मानवाधिकाराच्या उल्लंघनांचा निषेध करणारी पत्रके भिरकावण्यात आली. यातून जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात दमन शक्तीच्या बळावर लोकांचा आवाज दाबून टाकणाऱ्या हुकूमशहास लोकशाहीचे दर्शन घडले.

पॅरीस येथे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला लियेन आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची बैठक झाली. बैठकीच्या आरंभी उर्सुला लियेन यांनी जागतिक व्यापारात युरोपची चीनबरोबर आरोग्यपूर्ण स्पर्धा असावयास हवी. दोहोंच्या दरम्यान सध्याचा जो व्यापारविषयक असमतोल आहे तो चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले. युरोपियन, चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त इलेक्ट्रिक कार्स, पोलाद, पवन ऊर्जा तंत्रज्ञान या विरोधात व्यापार युद्ध छेडण्यास तयार आहे. किमती कमी करण्यासाठी चीनी सरकार आपल्या उद्योगांना जी अनुदाने देत आहे त्यामुळे युरोपियन उत्पादन क्षेत्रास धोका निर्माण होऊन रोजगार नष्ट होत असल्याचे लियेन यांनी जिनपिंग यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जिनपिंग यांनी चीनच्या अतिरिक्त उत्पादन क्षमतेमुळे जागतिक व युरोपच्या व्यापारावर परिणाम होत असल्याचे स्पष्टपणे नाकारले. युरोपच्या ज्या व्यापारविषयक तक्रारी आहेत त्या वाटाघाटी आणि सल्लामसलतीने सोडवण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

प्राथमिक वाटाघाटी दरम्यान मॅक्रॉन यांच्यासाठी युक्रेनचा मुद्दा महत्त्वाचा होता. चीन जरी या युद्धात अधिकृतरित्या तटस्थ असला तरी रशिया शस्त्रास्त्र निर्मितीसाठी चीनी यंत्रांचा आणि सुट्या सामग्रीचा वापर करीत आहे हे लपलेले नाही. गेली अडीच वर्षे सुरु असलेल्या या युद्धासाठी चीनने रशियास थेट शस्त्रपुरवठा करू नये आणि युद्ध थांबविण्यासाठी रशियास प्रवृत्त करावे, असे पाश्चिमात्य देशांना वाटते. मॅक्रॉन यांनी वाटाघाटीत युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी चीनने रशियावर दबाव आणावा असे आवाहन केले.

यावर जिनपिंग यांनी, ना आपण हे युद्ध सुरू केले आहे, ना त्यात आपला सहभाग आहे हे स्पष्ट करीत, तरीही युद्धाची आग भडकली असताना प्रेक्षकाची भूमिका न घेता युद्ध संपून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी भूमिका मांडली. परंतु निरिक्षकांच्या मते ही भूमिका फसवी आहे. या संदर्भात मॅक्रॉन यांनी अधिक कडक भाषा वापरावयास हवी होती. चीन युक्रेन युद्धात रशियास जो पाठिंबा देत आहे त्याची मोठी किंमत युरोपला मोजावी लागत आहे. रशियास सामग्री पुरवणाऱ्या चार चीनी कंपन्या युरोपियन युनियनच्या निर्बंध यादीत आहेत, हे

मॅक्रॉन यांनी जिनपिंग यांच्या नजरेस आणून द्यावयास हवे होते, असे निरिक्षकांचे मत आहे. एकंदरीत फ्रान्स नाटो देशांचा सदस्य म्हणून युक्रेनला मोठी मदत करीत आहे आणि चीन रशियाची पाठराखण करीत आहे. यामुळे उभयतांच्या वाटाघाटीतून युक्रेन युद्धाबाबत काही निष्पन्न होणार नाही हे अपेक्षीतच होते.

- अनिल अजगावकर

Advertisement
Tags :

.