वीरशैव लिंगायत स्वतंत्र धर्माच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षातच मतभेद मंत्री एम. बी. पाटील, ईश्वर खंड्रे यांच्यात मतभिन्नता
मंत्री एम. बी. पाटील, ईश्वर खंड्रे यांच्यात मतभिन्नता
बेंगळूर : राज्यात स्वतंत्र वीरशैव-लिंगायत धर्म स्थापनेच्या मुद्द्यावर सत्ताधारी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. रविवारी बेंगळूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमावेळी काही मठाधीशांनी स्वतंत्र वीरशैव-लिंगायत धर्म स्थापनेचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवत वेगळ्या धर्माच्या आवश्यकतेचे प्रतिपादन केले. मात्र, वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी स्वतंत्र धर्माच्या गरजेला विरोध व्यक्त केला. बेंगळूरमधील कार्यक्रमात बोलताना मंत्री एम. बी. पाटील यांनी वीरशैव लिंगायत समुदायाला विरक्त मठाच्या स्वामीजींनी विनंती केल्याप्रमाणे स्वतंत्र धर्माची मान्यता आवश्यक आहे. याकरिता समुदायाने सहकार्य करावे. जैन, शिख, बौद्ध यांच्याकडून कुणाला त्रास झाला का?, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. भौगोलिकदृष्ट्या आपण सर्वजण भारतीय आहोत, हिंदू आहोत. लिंगायत धर्म चातुर्वर्णापासून आलिप्त आहे. काल मठाधीशांच्या संघटनेने कार्यक्रम आयोजित केला. यात विरोधकांना निमंत्रण दिले नाहीत, असेही एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले. आम्ही हिंदूविरोधी नाही, वीरशैव विरोधीही नाही. ओबीसीमध्ये समावेश करा अशी मागणी करण्यात काय गैर आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
वीरशैव लिंगायत एकच : ईश्वर खंड्रे
कोणतीही शक्ती वीरशैव-लिंगायतांना वेगळे करू शकत नाही. दिवंगत डॉ. शिवकुमार स्वामीजींनीच वीरशैव लिंगायत एकच असल्याचे प्रतिपादन केल्याचे मंत्री ईश्वर खंड्रे यांनी म्हटले आहे. बेंगळूरमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, वीरशैव लिंगायत समुदायाच्या एकीमध्येच ताकद आहे. विभाजनामध्ये पराभव आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. आम्ही भौगोलिकदृष्ट्या हिंदू असलो आमच्या आचारविचारांचा आदर करत जैन, पारसी, शिखांना दिल्याप्रमाणे वीरशैव लिंगायत समुदायाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा 2000 मधील जगनणनेपासून करत आहे. असे ते म्हणाले.
विजयेंद्र यांचा आक्षेप
पुन्हा वीरशैव लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी. धर्माचे विभाजन करण्याचे काम कोण करत आहे? हे सर्वांना ठाऊक आहे. वक्कलिग, वीरशैव लिंगायत समुदायांमध्येही अनेक लोक गरीब आहेत. परंतु, काही लोक समुदायामदये फूट पाडण्याचे कृत्य करत आहेत, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला आहे.