ठाकरे सेना-काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन मतभेद
नाना पटोले अन् संजय राऊत यांच्यात भर बैठकीतच खडाजंगी : विदर्भातील जागा वाटपावरून वादाची ठिणगी
प्रतिनिधी / मुंबई
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही घमासान सुरूच आहे. 260 जागांवर बोलणी झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी अजूनही 25 ते 30 जागांवर महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. विशेष करून विदर्भातील जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात जागा न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील काही जागांवर अजूनही तिढा सुटलेला नाही. गुरुवारच्या बैठकीमध्ये पण नाना पटोले आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने जागावाटपाची बोलणी पुढे जाऊ शकले नाही. पटोले यांच्या भूमिकेमुळे जागावाटपामध्ये अडचण निर्माण झाल्याचे ठाकरेंच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा विषय त्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे मांडला आहे. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय व्हावा असा प्रयत्न महाविकास आघाडी करत असताना नाना पटोले यांची भूमिका अडचणीचे असल्याचे ठाकरेंच्या नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेतृत्वाकडे ठाकरे गटाकडून तक्रार करण्यात आली आहे. तत्काळ निर्णय घेऊन जागावाटप पूर्ण करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
मी राहूल गांधींच्यासोबत चर्चा करणार : संजय राऊत
जागा वाटपा संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, बऱ्याच जागा संदर्भातील चर्चा पूर्ण झाली आहे. मात्र काही जागांबाबत चर्चा अजूनही सुरू आहे. लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सुटण्यासाठी मी आज राहुल गांधी यांच्याशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटले होते. काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी माझं बोलणे झाले असून महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही सुद्धा माझं बोलणं झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागावाटपाचा चर्चा पुढे सरकण्यासाठी बोलणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुक आयोगाच्या कामात पारदर्शकता नाही : नाना पटोले यांची टीका
विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. आयोगाचे अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत असून ऑनलाईन फॉर्म 7 च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप देखील पटोले यांनी केला आहे. पटोले शिवालय येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
निवडणूक आयोग मोदी-शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. हे लोकशाहीला काळीमा फासणारे असून आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप होता कामा नये. सरकारी योजनांची माहिती देण्याच्या नावाखाली राज्यात 50 हजार योजना दूतांना 50 हजार ऊपयांवर नियुक्त केले असून हे योजनादूत भाजपा विचारांचे आहेत व ते भाजपाचा प्रचार करत आहेत. जनतेच्या पैशाने सुऊ असलेला हा भाजपचा प्रचार तात्काळ बंद करण्याची मागणी पटोले यांनी केली. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात मविआला जास्त मते पडली त्या मतदारसंघात साधारणपणे 10 हजारावर मते कमी करण्याचे षडयंत्र सुऊ आहे.
तुटेल इतके ताणू नये ,उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य
भाजप नेते राजन तेली यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. राजन तेली यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जात ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात झालेल्या वादावर भूमिका मांडली. या वादानंतर दोन्ही बाजूने सारवासारव केली जात आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणू नये, असा इशारा काँग्रेसला दिला आहे.