काश्मीरमध्ये पुन्हा परप्रांतियांवर हल्ला
दहशतवाद्यांकडून दोन मजुरांवर गोळीबार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये बिगर काश्मिरींवर होणारे हल्ले थांबताना दिसत नाहीत. शुक्रवारी बडगाम जिह्यात दहशतवाद्यांनी दोन मजुरांवर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर कामगारांना तातडीने ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे दोन्ही मजूर परिसरातील जलजीवन प्रकल्पस्थळी काम करत होते. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीच्या हाताला, तर दुसऱ्याच्या पायाला गोळी लागली. या घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
मध्य काश्मीरमधील बडगाममधील माझमा भागात हा हल्ला झाला. हे दोन्ही मजूर उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. सुफियान आणि उस्मान अशी त्यांची नावे आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोरांच्या अटकेसाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.