भुतरामट्टीजवळ अपघातात दिव्यांग तरुण ठार
भरधाव ट्रकची तिचाकीला धडक
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव ट्रकने तीन चाकीला ठोकरल्याने एक दिव्यांग तरुण जागीच ठार झाला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामट्टीजवळ शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
शशीधर रायप्पा होंडाई (वय 28 रा. भुतरामट्टी) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. शशीधर दिव्यांग होता. गावात किराणा दुकान चालवित होता. शनिवारी सायंकाळी आपल्या डेस्टिनी तीन चाकीवरून जाताना संकेश्वरहून बेळगावकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला.
शशीधरच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. दिव्यांग असला तरी किराणा दुकान चालवून तो स्वत:चा गुजराण करीत होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या अपघातानंतर ट्रक चालकाने आपली ट्रक तेथेच सोडून पलायन केले आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.