राज्याच्या अर्थकारणात आता दिव्यांगांचाही सहभाग
राज्य दिव्यांगजन आयुक्त, गोवा माईल्स यांच्यात सामंजस्य करार : गोवा माईल्सच्या पोर्टलद्वारे चालणार पर्पल ई-रिक्षा
पणजी : गोव्याच्या आर्थिक विकासामध्ये दिव्यांग नागरिकांचा सहभाग वाढावा आणि त्यांचेही आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि ‘गोवा माईल्स’ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. सर्वसमावेशक गोवा या उपक्रमाअंतर्गत पर्पल ई-रिक्षा सुरू करण्यात आली आहे. गोवा माईल्सच्या पोर्टलद्वारे ही सुविधा चालवली जाणार आहे. राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि गोवा माईल्स यांच्यात करार झाल्याने आता दिव्यांग बांधवांचाही राज्याच्या अर्थकारणात सहभाग होणार आहे. सामंजस्य करारावेळी गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव ई. वल्लावन, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुऊप्रसाद पावसकर, सचिव ताहा हाजिक, गोवा माईल्सचे व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष सुधीर दाभाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांगांना फिरण्याचे स्वातंत्र्य
गोवा माईल्सच्या पोर्टलद्वारे ई-रिक्षा सेवा प्रारंभ केल्यानंतर मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, या सहकार्य करारामुळे दिव्यांग व्यक्तींना उपजिविकेचे शाश्वत साधन मिळवणे शक्य होणार आहे. तसेच इतरांवर विसंबून न राहता फिरण्याचे स्वातंत्र्यदेखील त्यांना मिळणार आहे. जिथे प्रत्येक व्यक्ती सन्मानजनक आणि स्वतंत्रपणे भरारी घेऊ शकेल, असे सर्वसमावेश वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत. राज्य दिव्यांगजन आयुक्त पावसकर म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये अधिक सुलभता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या दिशेने आम्ही राबवलेल्या प्रयत्नांमध्ये गोवा माईल्ससोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या सहकार्य करारामुळे दिव्यांग व्यक्तींना अधिक सहज, सुलभ प्रवासाचे पर्याय उपलब्ध होणार असून ते सन्मानाने प्रवास करण्यासाठी सक्षम होणार आहेत. या उपक्रमासाठी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय प्रवासासाठी सुलभ वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या ई-रिक्षा उपलब्ध करणार आहे, असेही ते म्हणाले.
गोवा माईल्स दिव्यांगांना देणार प्रशिक्षण
ई-रिक्षा प्रभावीपणे चालवण्यासाठी चालकांना आवश्यक कौशल्याने सुसज्ज करण्यासाठी गोवा माईल्सतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच दिव्यांगजन आणि त्यांच्या कुटुंबीयांना सक्षम करण्यासाठी गोवा माईल्सद्वारे अनुकूल व्यवसाय प्रारूपही विकसित केले जाणार आहे.