Kolhapur News: अपंग असूनही गाडीचे स्टेअरिंग हातात, मनाने चालायला शिकलेल्या जिद्दी 'इलियास बागवान' यांची कहाणी!
आज ते अपंग असूनही कोणाच्याही मदतीशिवाय गाडी चालवतात
By : इंद्रजीत गडकरी
कोल्हापूर : “पायांनी नाही, मनाने चालायला शिका!“ ही म्हण खरी करून दाखवली आहे सांगली येथील इलियास बाबू बागवान यांनी. जन्मत: दोन पायांना पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या इलियास यांनी, केवळ सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं नाही, तर स्वत: चारचाकी चालवण्याची अपूर्ण इच्छा देखील पूर्ण केली.
सध्या समाजात नैराश्येतून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे अशा परिस्थितीत तरूणांनी बागवान यांच्याकडे डोळसपणे पाहून आपले करियर घडवण्याची गरज आहे. 2024 मध्ये त्यांनी सात आसनी गाडी खरेदी केली आणि पुण्याच्या ‘ऑटोमेट इंडिया‘ या संस्थेमार्फत हाताने चालवता येणारी विशेष तांत्रिक व्यवस्था गाडीत बसवून घेतली. आज ते अपंग असूनही कोणाच्याही मदतीशिवाय गाडी चालवतात. त्यांच्या या आत्मनिर्भरतेला अनेकजण उभं राहून सलाम करतात.
बालपणीच अंधार, पण मनात उजेड
1982 साली सांगली येथे जन्मलेले इलियास यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओ झाला. दोन्ही पाय कायमचे निकामी झाले. पण यामुळे त्यांचे शिक्षण थांबले नाही. त्यांनी नगरपालिका शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. घरची परिस्थिती हालाखीची होती. दहावीनंतर शिक्षण चालू ठेवण्यासाठी त्यांनी एस.टी.डी.बूथ, पतसंस्था यासारख्या ठिकाणी काम केलं आणि त्याच वेळी बी. कॉम, जे.डी.सी. अँड ए. ही शैक्षणिक पात्रता मिळवली.
सरकारी नोकरी आणि फुलणारी स्वप्नं
लहानपणापासून सरकारी सेवेत जाण्याची इच्छा होती. सहा वर्षे प्रयत्न केल्यानंतर, 2006 साली जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सध्या ते जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे कार्यरत आहेत.
या नोकरीमुळे त्यांनी घर बांधले, कुटुंबासाठी दवाखाना सुरू केला, लग्नकार्य पार पाडले आणि दोन गोंडस मुलींच्या रूपाने कुटुंब पूर्ण झालं. पण त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचं स्वप्न अजून अपूर्ण होतं, स्वत: चारचाकी चालवण्याच !
सामाजिक कार्यातही आघाडीवर
इलियास बागवान हे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष आहेत.ते अपंग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडत असतात. त्याचबरोबर सांगली महसूल कर्मचारी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी गौरवलं आहे.
बागवान यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेत काम केले आहे.त्यांच्याकडे येणाऱ्या अपंगांना मदत करतात. तसेच मिरजेतील अपंग सेवा संस्थेसाठी सेमिनार देखील घेत असतात. आपल्यासारख्याच अपंग बांधवांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा त्यांचा मानस असतो
आई-वडिलांची साथ, मित्रांची प्रेरणा
त्यांच्या या लढाऊ प्रवासामध्ये त्यांच्या आई-वडिलांची, भावंडांची आणि मित्रांची मोलाची साथ होती. आज ते जरी यशस्वी अधिकारी आणि कुटुंबवत्सल पती, वडील असले तरी, आई-वडिलांची उणीव आजही त्यांच्या मनाला जाणवते. इलियास बाबू बागवान यांचं संपूर्ण आयुष्य हे प्रत्येक अपंग व्यक्तीसाठी आणि सामान्य व्यक्तीसाठीही एक प्रेरणास्त्राsत आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं, तर मुश्किलोंने कभी हमको तन्हा नही छोडा, मगर हमने भी शान से कभी जीना नही छोडा.
अपंग असूनही गाडीचा स्टेअरिंग हातात !
सामान्य माणूस जसा रस्त्यावर गाडी चालवतो, तसंच मीही चालवावं, ही इच्छा होतीच,“ असं ते अभिमानाने सांगतात. 2024 मध्ये त्यांनी नवी 7 सीटर फोर व्हीलर खरेदी केली आणि पुण्यातील कंपनीच्या सहाय्याने गाडी हाताने चालवण्यासाठी आवश्यक यंत्रणा बसवून घेतली.
आज ते स्वत: ऑफिस, कार्यक्रम, दौरे, कुटुंबासह प्रवास करताना गाडी स्वत: चालवतात. या आत्मनिर्भरतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. ही केवळ एक गाडी नाही, तर त्यांच्या आत्मसन्मानाचं आणि संघर्षाच्या यशाचं प्रतीक आहे.