ठाकरे बंधूंची मातोश्रीवर भेट समजनेवालोंको इशारा थेट
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. ठाकरे ब्रॅन्ड संपला बोलणाऱ्यांना आम्हाला कमी लेखाल तर ही भेट म्हणजे तुम्हाला थेट इशारा असल्याचे दोघांनी विरोधकांना सांगितले आहे. गेल्या आठवड्यात 22 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस झाला, या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देणाऱ्या राज ठाकरे यांनी मात्र या वाढदिवसाला फडणवीस यांना शुभेच्छा देणे टाळले आहे. राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपबरोबरच एकनाथ शिंदे यांच्यापासून देखील अंतर ठेवताना दिसत आहेत. बाळासाहेबांच्या खुर्चीला वंदन कऊन राज आणि उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या फोटोसमोर एकत्र येणे, म्हणजे मराठी भाषा आणि मराठी माणूस या दोन विषयांवरच भविष्यात हे दोन नेते एकत्र येताना दिसणार आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यासाठी 20 वर्षानंतर एकत्र आले. त्यानंतर राज आणि उध्दव राजकारणासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर मिरारोड येथे मराठी-अमराठी वादानंतर, अमराठी भाषिकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांनी मोर्चा काढला, या मोर्चात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकत्र दिसले. तर सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागल्याने पोलीसांच्या मदतीने त्यांना काढता पाय घ्यावा लागला.
थोडक्यात मराठी भाषिकांचा रोष हा सरकारवर आहे, भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाविरोधात असल्याचे स्पष्ट झाले. तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर विजयी मेळाव्यासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंचे मराठी भाषिकांनी जोरदार स्वागत केले. यावऊन राज ठाकरे यांना भविष्यातील पाहिजे ते संकेत मिळाले असून, त्यामुळेच की काय राज ठाकरे सध्या भाजपपासून जरा अंतर ठेवताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे हे आधीच भाजपचे कट्टर विरोधक आहेत. अशा पार्श्वभूमीवर दोघांची मातोश्रीवर भेट म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला थेट इशारा मानला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता, या भेटीचे महत्त्व अधिकच वाढताना दिसत आहे. राज आणि उध्दव ठाकरे यांनी फक्त मराठी भाषेसाठी कोणताही झेंडा न घेता मराठी भाषा हाच अजेंडा असल्याचे विजयी मेळाव्यावेळी सांगितले. यावेळी उध्दव ठाकरे यांनी आता एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी असे बोलताना युतीचे संकेत दिले.
संजय राऊत यांच्या मुलाखतीतही राज आता सोबत आल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले. मात्र मनसेकडून याबाबत कोणीच बोलत नव्हते तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी युतीबाबत बाहेर माध्यमासमोर भाष्य करताना माझ्याशी बोलल्याशिवाय कऊ नये असा इशाराच मनसे नेते आणि कार्यकर्ते यांना दिला. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र रविवारी मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी जेव्हा दोन पक्ष एकत्र येतात तेव्हा 1 अधिक 1 दोन होतात मात्र जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतात तेव्हा एक अधिक एक अकरा होतात, असा इशारा देत या युतीबाबत भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ही भेट केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी होती. तरी या भेटीतून राज ठाकरे यांनी योग्य तो इशारा ज्यांना द्यायचा तो दिला आहे.
शेवटी राज आणि उद्धव हे बाळासाहेबांचे वारस आहेत. त्यांचं एकत्र येणं म्हणजे ठाकरेंचं ब्रँडचं पुनऊज्जीवन असणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेना आणि मनसेची ताकद एकवटू शकते. विरोधकांना टक्कर देण्यासाठी हे समीकरण प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे ही भेट केवळ नात्यांपुरती नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील भुकंपाची मोठी नांदी असणार आहे. राज्यातील भाजपप्रणीत महायुती सरकार हे मराठी भाषा आणि अस्मिता विरोधी असल्याचा संदेश हा राज्यातील जनतेत गेला आहे. मग ते राज्यातील प्रकल्प गुजरातला न्यायचा विषय असो, हिंदी भाषा सक्तीचा विषय असो, मराठी भाषिकांवर होणारा अन्याय असो, मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, नाशिक या महापालिकांमध्ये मराठी मते ही निर्णायक ठरणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदे गटाचं मराठी मतांवरचं वर्चस्व धोक्यात येणार यात शंका नाही. राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारांचे बेशिस्त वर्तन यावर राज ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली.
अधिवेशनानंतर एकनाथ शिंदे बॅकफुटवर आल्याचे बघायला मिळत आहे. मराठी भाषेच्या मुद्यावर शिंदे यांच्या शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतली नाही. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्याला शिवसेना शिंदे गटाचे कोणीही न आल्याने शिंदे गटासाठी हा मुद्दा आगामी निवडणूकीसाठी अडचणीचा ठरणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास ‘मराठी अस्मिता’चा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहे. सरकारविरोधी हीच भूमिका कायम ठेवल्यास ठाकरे ब्रॅन्डला मराठी मतदारांचा मोठा पाठिंबा मिळेल, यात शंका नाही.
राज ठाकरे यांच्या मनसेने गेल्या 19 वर्षात कोणाशीच निवडणूकपूर्व युती केलेली नाही, उध्दव ठाकरेंबरोबर जर मनसेची निवडणूकपूर्व युती झाल्यास मनसेची ही पहिली निवडणूकपूर्व युती असणार आहे. राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांना रविवारी शुभेच्छा देताना शिवसेना प्रमुख असा उल्लेख करणे म्हणजे, हेच खूप काही सांगून जाते. यापूर्वीदेखील राज ठाकरे यांनी सभेत बोलताना तुम्हाला काय राजकारण करायचे ते करा, मात्र बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाला हात लावू नका, असे मी भाजप आणि एकनाथ शिंदेंना सांगितल्याचे जाहिरपणे सांगितले होते.
आता भविष्यात राज ठाकरे अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट करतीलच पण, ज्या लोकांना राजकारणातील ओळख ही ठाकरेंमुळे मिळाली, तेच लोक आज ठाकरे ब्रँड संपल्याचे सांगत आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचे व्यवस्थापन कौशल्य, राज ठाकरे यांची भाषणकला आणि आक्रमकता याचा संगम झाल्यास, भाजपसमोर देखील ठाकरे ब्रँन्डचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंना शुभेच्छा देणे ही भेट अनेकांना थेट इशारा देणारी असणार आहे.
प्रवीण काळे