डिंगा-डिंगा विषाणूची युगांडामध्ये दहशत
300 हून अधिक जणांना लागण : अंगात थरथर होण्याचे प्रकार
वृत्तसंस्था/ कंपाला
आफ्रिकन देश युगांडामध्ये 300 हून अधिक लोकांना डिंगा डिंगा विषाणूची लागण झाली आहे. बाधितांमध्ये बहुतांश महिला आणि मुलींचा समावेश आहे. युगांडातील बुंदीबाग्यो जिल्ह्यात या गूढ आजाराचा सर्वात मोठा परिणाम दिसून आला आहे. या आजारामध्ये अंगात प्रचंड थरथर जाणवत असून त्यापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही. सध्या संक्रमित लोकांवर अँटीबायोटिक्स देऊन उपचार केले जात आहेत. यातून सावरण्यासाठी सुमारे एक आठवडा लागणार आहे. मात्र, सद्यस्थितीत बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे देशात दहशत पसरली आहे.
रुग्णाला डिंगा डिंगा या विषाणूची लागण होते, तेव्हा त्याच्या शरीरात तीव्र थरकाप सुरू होतो. ही थरथर इतकी तीव्र असते की रुग्ण नाचत असल्यासारखे दिसते. संसर्ग गंभीर असल्यास, रुग्णाला अर्धांगवायू देखील होऊ शकतो. बुंदीबाग्यो जिल्हा आरोग्य अधिकारी कियिता क्रिस्टोफर यांच्या मते, हा विषाणू पहिल्यांदा 2023 मध्ये आढळला होता. तेव्हापासून युगांडा सरकार याची चौकशी करत आहे. युगांडाच्या आरोग्य विभागाने अद्याप डिंगा डिंगा विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या आरोग्य विभागाने लोकांना वेळेवर औषधोपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. बाधित रुग्णांवर बुंदीबागी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.