महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिनेश कार्तिकचा आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप

06:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

जवळपास 20 वर्षे क्रिकेट कारकिर्दीत यष्टीरक्षक आणि फलंदाज अशी दुहेरी भूमिका बजावणारा 38 वर्षीय दिनेश कार्तिकने आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील चेन्नईत बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव केल्यानंतर कार्तिकने हा निर्णय घेतला. सामना संपल्यानंतर कार्तिकला त्याच्या अनेक चाहत्यांनी मानवंदना दिली. दिनेश कार्तिकने आपल्या वैयक्तीक क्रिकेट कारकिर्दीत 26 कसोटी, 94 वनडे आणि 60 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. क्रिकेटच्या या विविध प्रकारामध्ये त्याचे विविध मालीकामध्ये पुनरागामन होत असे. शेवटच्या क्षणापर्यंत दिनेश कार्तिकने क्रिकेटशी मैदानावर निगडीत राहण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत त्याला आपला वेळ मैदानापेक्षा समालोचन कक्षामध्ये घालवावा लागला होता. अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने 1 जुनपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ निवड करण्याकरीता निवड सदस्यांमध्ये कार्तिकच्या नावाची चर्चा करावी लागली. पण निवड समितीने नवोदित क्रिकेटपटूंना संधी देण्यावर अधिक भर देत संघाची घोषणा केली. या घटनेनंतर कार्तिकने निवृत्त होण्याचा निर्णय निश्चितपणे घेतला.

Advertisement

चेन्नईत जन्मलेल्या दिनेश कार्तिकने आपल्या वयाच्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2004 साली इंग्लड विरूध्दच्या लॉर्डस् मैदानावरील वनडे सामन्यात पदापर्ण केले. या सामन्यात इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार मायकल वॉनला दिनेश कार्तिकने यष्टीचित करून आपल्या यष्टीरक्षणाच्या दर्जाची चाहुल दाखविली. 2004 साली डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरूध्द त्याने आपले कसोटी पदापर्ण केले. याच कालावधीत भारतीय संघाला धोनीच्या रूपात जागतिक दर्जाचा यष्टीरक्षक तसेच फलंदाज आणि कुशल कर्णधार लाभल्याने दिनेश कार्तिकला संघामध्ये स्थान टिकविणे अवघड झाले. 2007 साली इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये अंतिम 11 खेळाडूत धोनीचा समावेश असताना दिनेश कार्तिकला सलामीला फलंदाजीसाठी पाठविण्यात आले होते. भारताने विदेशातील ही कसोटी मालीका जिंकल्याने संपूर्ण संघाला शौकीनांनी उभे राहून मानवंदना दिली. 2010 ते 2017 या कालवधीत दिनेश कार्तिकने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली. 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय निवड समितीने पुन्हा कार्तिकला राष्ट्रीय संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला होता. 2017 ते 2019 या कालावधीत दिनेश कार्तिकने वनडे आणि टी-20 प्रकारामध्ये भारतीय संघातील स्थान राखले होते. कोलंबोमध्ये 2018 च्या निधास टी-20 चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकून आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. या स्पर्धेनंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर दिनेश कार्तिकचे तब्बल आठ वर्षानंतर भारतीय कसोटी संघात पुन्हा आगमन झाले होते. 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी दिनेश कार्तिकचे संघातील स्थान जवळपास निश्चित मानले जात होते. पण ऑस्ट्रलिया विरूध्द मायदेशात झालेल्या मालिकेसाठी त्याला संघातून वगळ्यात आले होते. इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या या महत्वाच्या स्पर्धेसाठी निवड समितीने दिनेश कार्तिकची निवड करून सर्वांना चकित केले होते. पण या स्पर्धेत त्याला केवळ तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. दिनेश कार्तिक आता मैदानावर खेळताना दिसणार नाही पण समलोचन पक्षामध्ये त्याचे निश्चितच पुनरागमन होईल अशी अपेक्षा बाळगली जाते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article