जब तक जिंदा हूं, Congress का परिंदा हूं; म्हणणाऱ्या Dilip Sananda यांनी हाती घड्याळ का बांधलं?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला विदर्भात फटका बसणार?
Dilip Sananda Latest Marathi News : काँग्रेससोबत 40 वर्षांपासून असणाऱ्या नेत्याने काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला विदर्भात फटका बसणार आहे. बुलढाणा जिह्यातील खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गुरुवारी दाखल झाले.
कॉंग्रेसमधील त्यांचा 40 वर्षांचा प्रवास थांबला आहे. मागील काळात काँग्रेसने मला भरभरून दिले. मी सांगेन ती पूर्व दिशा होती. स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मोठा निधी मिळाला. काँग्रेसची जी विचारसरणी आहे तीच अजित पवारांची आहे. माझे कार्यकर्ते सत्तेत जावे, त्यांची कामे व्हावी, यासाठी दादांच्या राष्ट्रवादीत हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
आज विलासराव असते तर माझ्यावर ही वेळच आली नसती, असे ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करत सानंदा म्हणाले, ज्यांनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले, त्या कम्पूच्या हातात सूत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये नाराज होतो. त्यांनी माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण माझा निर्णय ठाम होता.
आता अजित पवार यांची राष्ट्रवादी बुलढाणा, अकोला, वाशीमसह विदर्भात वाढविणे हा माझा संकल्प आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा 100 टक्के फडकणार आहे. आम्ही सर्व शक्तीनिशी लढू आणि जिंकून दाखवू, असा विश्वास सानंदा यांनी व्यक्त केला.