दीक्षा डागरला सुवर्ण तर संधूला रौप्य
वृत्तसंस्था/टोकियो
येथे सुरु असलेल्या 25 व्या उन्हाळी डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्फ या क्रीडा प्राकारात भारताची महिला गोल्फपटू दीक्षा डागरने सुवर्णपदक पटकाविले तर नेमबाजीत महित संधूने रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेमध्ये भारताने नेमबाजी प्रकारात एकूण 12 पदकांची कमाई केली. त्यामध्ये महित संधूने 3 पदके मिळविली आहेत. महितने याआधी महिलांच्या 10 मी. मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण तर 10 मी. वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक मिळविले आहे.
या स्पर्धेतील गोल्फ या क्रीडा प्रकारात 24 वर्षीय दीक्षा डागरने शेवटच्या फेरीत 11-अंडर गुण नोंदवित सुवर्णपदकाला गवसणी घातली. 2017 साली झालेल्या डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच गोल्फचा समावेश करण्यात आला होता आणि दीक्षाने रौप्यपदक पटकाविले होते. टोकियोमधील स्पर्धेत या क्रीडा प्रकारातील पहिल्या दिवशी दीक्षाने फोर अंडर 68 गुण नोंदविले होते. या क्रीडा प्रकारात विविध देशांचे 21 गोल्फपटू सहभागी झाले होते. फ्रान्सच्या ब्रेजोने रौप्य तर कॅनडाच्या इरिका रिव्हार्दने कांस्यपदक मिळविले.
नेमबाजीतील 50 मी. रायफल प्रोन या क्रीडा प्रकारात महित संधूने 246.1 गुण नोंदवित रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात झेकच्या इलिस्का सेवोबोडोव्हाने 247.2 गुणांसह सुवर्णपदक तर हंगेरीच्या मीरा बिटोव्हेस्कीने 225.0 गुणांची नोंद करत कांस्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात सहभागी झालेली भारताची आणखी एक महिला नेमबाज नताशा जोशीला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.