डिजिटल ताकद जगाला दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी : धारवाड येथे आयआयटीसह जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे उद्घाटन
बेंगळूर, हुबळी : गेल्या 9 वर्षात देशाच्या अनेक भागांमध्ये आयआयटी आणि आयआयएमची स्थापना झाली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पायाभरणी झालेल्या आयआयटीचे उद्घाटन 4 वर्षांच्या कोरोना संकटानंतर झाले. नवीन आयआयटी पॅम्पसमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा असतील. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण मिळण्याची संधी मिळाली पाहिजे. भारताची डिजिटल ताकद जगाला दाखवून देण्यायोग्य असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. धारवाड येथे रविवारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म असलेल्या हुबळी सिद्धारुढ स्वामीजी रेल्वे प्लॅटफॉर्मसह विविध विकास योजनांचे उद्घाटन करून ते बोलत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये लोकशाहीवर टीका केल्याचे अप्रत्यक्षपणे नमूद करताना मोदी म्हणाले, जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाहीला कधीही खीळ घालू शकत नाही. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही वारशाचे काहीही करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधीवर सडकून टीका
दरम्यान, मोदी यांनी विश्वगुरु बसवण्णा व त्यांच्या अनुभव मंटपाचा उल्लेख केला. काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये बसवेश्वरांची मूर्ती लोकार्पण करण्याची संधी आपल्याला मिळाली होती. त्याद्वारे अनुभव सभागृहाचे महत्त्व समजावून सांगितले होते. पण आता लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही वारशाचे काहीही करू शकत नाही. देशाच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बसवेश्वरांचा अवमान करण्यात आला आहे. 140 कोटी भारतीयांचाही अपमान झाला आहे. अशा लोकांना दूर ठेवले पाहिजे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
हायटेक इंडियाचे इंजिन म्हणून कर्नाटकचे कौतुक
चांगल्या, आधुनिक पायाभूत सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधांमुळे जीवन सोपे होते आणि आपल्या समाजातील प्रत्येक घटकाचा फायदा होतो. लोकांना चांगले रस्ते, आरोग्य सेवा देण्यास प्राधान्य दिले आहे. पीएम सडक योजनेतून गावागावात रस्ते विकसित करण्यात आले आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्राला आधुनिकतेचा स्पर्श देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत कर्नाटकने मैलाचा दगड रचला आहे. सिद्धारुढ स्वामीजी रेल्वेस्थानक हे जगातील सर्वात मोठे रेल्वेस्थानक बनले आहे. विकासाच्या दृष्टीने हे सर्व नवे विक्रम आहेत. हायटेक इंडियाचे इंजिन म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकचे कौतुक केले.