सावंतवाडी टर्मिनससाठी " डिजिटल एल्गार "
टर्मिनसचा लढा आता अटकेपार
न्हावेली /वार्ताहर
गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या कोकण रेल्वे सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता कोकणातील जनतेने डिजिटल एल्गार पुकारला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषत : व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुपच्या साहाय्याने कमीत कमी ५० हजार कोकणी जनतेपर्यंत पोहोचण्याचा महत्वाकांक्षी मानस ठेवण्यात आला आहे.
टर्मिनस हेच एक उद्दिष्ट....
या कम्युनिटी ग्रुपचे एकच आणि महत्वाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे दहा वर्षे रखडलेले कोकण रेल्वे टर्मिनस तातडीने मार्गी लावणे.टर्मिनस पूर्ण झाल्यास केवळ कोकण मर्यादित गाड्यांची संख्या वाढणार असून प्रवाशांना शौचालयाच्या शेजारी प्रवास करण्याची वेळ येणार नाही,असा विश्वास या लढ्यात सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.या लढ्यामुळे प्रामुख्याने मुंबई,पुणे,कल्याण,डोंबिवली,माणगाव,वीर,कोलाड,खेड,चिपळूण,सावर्डे,संगमेश्वर,आरवली,रत्नागिरी,आडवली,विलवडे,राजापूर,खारेपाटण,वैभववाडी, कणकवली,कुडाळ,झारा आणि सावंतवाडी येथील कोकणी जनतेला मोठा फायदा होणार आहे.
-----------
किमान दोन ' तुतारी एक्सप्रेस '
या आंदोलनाचे तातडीचे ध्येय म्हणून कोकणासाठी अजून किमान दोन तुतारी एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी जोर धरणार आहे.यात पुणे ,कल्याण ,सावंतवाडी एक्सप्रेस,वसई भिवंडी सावंतवाडी एक्सप्रेस यांचा समावेश आहे.या मोहिमेला व्यापक स्वरुप देण्यासाठी आयोजकांनी प्रत्येक कोकणवासीयाला या ग्रुपची लिंक आपल्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करणायाची विंनती केली आहे.प्रत्येकांने किमान एक ग्रुप ॲड केल्यास कमीत कमी पन्नास हजार कोकणी लोक आपल्या या ग्रुपवर जॉईन होतील आणि आंदोलनाला बळ मिळेल असा विश्वास आहे.आयोजकांनी व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये ग्रुप कसे ॲड करावेत याबद्दल सविस्तर माहिती देत लोकांना जास्तीत जास्त सक्रीय होण्याची विनंती केली आहे.कोकणवासीयांच्या एकत्रित प्रयत्नातून रेल्वे टर्मिनसचा हा प्रलंबित प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.