‘डिजिटल अरेस्ट’
भारत सध्या ‘डिजिटल क्रांती’च्या काळातून प्रवास करीत आहे. या क्रांतीचे जसे अनेक लाभ आहेत, तसेच तोटेही आहेत. ही क्रांती खऱ्या अर्थाने यशस्वी करायची असेल तर, तिचे लाभ आणि तोटे यांच्यासंबंधात लोकांचे योग्य प्रकारे प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. या क्रांतीची लाभाची बाजू भक्कम करण्यासाठी आणि तोट्याची बाजू अधिकाधिक सौम्य करण्यासाठी आधी डिजिटल व्यवहार कसे चालतात, याची सर्वंकष माहिती करुन घ्यावी लागते. या डिजिटल क्रांतीने लोकांचे आर्थिक व्यवहार सुलभ केले तसेच स्वच्छही केले. लोकांसाठी घरबसल्या जगभरातील मनोरंजन आणि ज्ञान यांची कवाडे उघडून दिली. एकमेकांशी संपर्क सोपा केला. आज शिक्षण, आरोग्य, संरक्षण, उद्योग, सेवा, राजकारण, मनोरंजन आदी क्षेत्रे ‘डिजिटायझेशन’मय झाली आहेत. इतकी की, त्याशिवाय त्यांचे चालेनासेच झाले आहे. तथापि, याच डिजिटल क्रांतीने अनेक नव्या गुन्ह्यांनाही जन्म दिला आहे. आजवर आपण कल्पनाही करु शकत नव्हतो, अशा ‘डिजिटल’ गुन्ह्यांच्या जाळ्यात आपण अडकत चाललो आहोत. आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशावर डल्ला मारला जात आहे. मन:स्वास्थ्य बिघडवले जात आहे. यामध्ये अग्रस्थानी आहे ‘डिजिटल अरेस्ट’ नामक कल्पक पण घातक प्रकार. यापासून सावध राहणे आणि आपले मानसिक स्वास्थ्य तसेच पैसा यांचे संरक्षण करणे हे आपलेच कर्तव्य आहे. या नव्या युगातील नव्या गुन्ह्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न...
काय आहे ‘डिजिलट अरेस्ट’...
ड अगदी सोप्या भाषेत सांगायचे, तर हा एक प्रकारचा डिजिटल घोटाळा किंवा स्कॅम आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये या घोटाळ्यात सापडून अनेक भारतीयांनी शेकडो कोटी रुपये गमावले आहेत. आपल्यावर तशी वेळ येऊ नये, म्हणून या प्रकाराची नीट माहिती करुन घेण्याची आवश्यकता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
ड या प्रकारात व्हिडीओ कॉल्सचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने हा प्रयोग धनवान व्यक्तींवरच केला जातो. कारण त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळणे शक्य असते. हा प्रकार करणाऱ्या लोकांनी, अर्थात या गुन्हेगारांनी आधी अशा सावजांची, त्यांच्या सांपत्तिक स्थितीची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती काढलेली असते.
ड असे धनवान सावज हेरुन प्रथम त्याला एक व्हिडीओ कॉल केला जातो. व्हिडीओ कॉल करणारी व्यक्ती ही आपण पोलिस अधिकारी किंवा सरकारी सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी असल्याच्या आविर्भावात आपल्या सावजाला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा संदेश देते. अरेस्ट किंवा अटक हा शब्दानेच सावज भेदरुन जाते.
ड त्यानंतर सावजाशी टप्प्याटप्प्याने पैसे लुबाडण्याचा खेळ केला जातो. ‘तुझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे. त्यातून सुटका हवी असेल तर अमूक इतकी रक्कम या विशिष्ट बँक खात्यावर जमा कर. अन्यथा तुझी या अरेस्टमधून सुटका होणार नाही, अशा धमक्या देऊन त्याला रक्कम हस्तांतरीत करण्यास भाग पाडले जाते.
ड सर्वच लोक अशा धमक्यांना भीक घालतात असे नाही. जे ‘खमके’ असतात आणि ज्यांना या प्रकाराची माहिती असते, ते त्याला बळी पडत नाहीत. मात्र, कमजोर मनाचे किंवा ‘व्हल्नरेबल’ म्हणजे धमक्यांना फशी पडणारे लोक त्यांची शिकार होतात. या गुन्हेगारांच्या आदेशाप्रमाणे वागून त्यांचा कार्यभाग साधतात.
गुन्ह्याची कार्यपद्धती अशी असते...
ड हा गुन्हा करणारी व्यक्ती, स्वत: सीबीआय अधिकारी, प्राप्तीकर अधिकारी, पोलिस अधिकारी, कस्टम अधिकारी किंवा तशा प्रकारचे अधिकारी असल्याची बतावणी करते. वास्तविक हे गुन्हेगार अशाप्रकारचे कोणतेही अधिकानी नसतातच. पण लोकांच्या मनात पोलीस, सीबीआय, ईडी, प्राप्तिकर अधिकाऱ्यांसंबंधी जी भीती असते, त्या भीतीचा लाभ उठविला जातो.
ड अशी बनावट अधिकारी व्यक्ती व्हिडीओ कॉल करुन आपल्या सावजांशी संपर्क साधते. आपल्यावर आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप सादर झाला आहे, किंवा आपण करचुकवेगिरी केली आहे, किंवा आपल्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदला गेला आहे इत्यादी संदेश दिला जातो. बनावट गुन्हा नोंदणी क्रमांकही दिला जातो. परिणाम गंभीर होतील असा इशारा देऊन सावजाला घाबरविले जाते.
ड सावजाच्या मनात भीती निर्माण व्हावी आणि त्याने आपल्या आधीन व्हावे, यासाठी हे गुन्हेगार पोलीस स्थानकाचे दृष्यही निर्माण करतात आणि ते दृष्य व्हिडीओ कॉलवरून सावजाला पाठविले जाते. हा कॉल कायदेशीर आहे असा आभास निर्माण केला जातो. व्हॉटस्अप किंवा स्कायपे अशा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मस्चा उपयोग हा आभास निर्माण करण्यासाठी करण्यात येतो.
ड आपल्यावर नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यातून आपल्याला बाहेर काढणे आमच्या हाती आहे. पण त्यासाठी आमच्याशी सहकार्य करावे लागेल. तुमचा तपास करण्यात येत आहे. तपासात सहकार्य न केल्यास तुम्ही उद्ध्वस्त व्हाल, अशा धमक्या दिल्या जातात. विशिष्ट रकमेचे रीफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट ठेवा, असा संदेश दिला जातो. या सर्व वातावरण निर्मितीने सावजाला घाबरविले जाते.
ड या सर्व आविर्भावाला घाबरुन अनेकजण गुन्हेगार सांगतील त्याप्रमाणे आणि सांगतील त्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करतात. हे पैसे त्या खात्यांवरुन त्वरित काढले जातात आणि गुन्हेगार अदृष्य होतात. त्यानंतर आपली फसवणूक झाली आहे, हे सावजाच्या लक्षात येते. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. सावजाचे लक्षावधी रुपये लुबडले गेलेले असतात आणि हताश होण्यापलिकडे काही करता येत नाही.
गुन्हेगारांची युक्ती का यशस्वी होते ?
ड अगदी सुशिक्षित असणाऱ्या लोकांविरोधात या डिजिटल गुन्हेगारांनी टाकलेला हा डाव यशस्वी का होतो, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम आदी सरकारी प्राधिकारणासंबंधी लोकांच्या मनात असणारी भीती आणि या विभागांच्या कार्यपद्धती संबंधी असणारे लोकांचे अज्ञान, तसेच कायद्यातील तरतूद नेमकी काय आहे, याची माहिती नसणे, स्वत:चे अधिकार काय आहेत, हे माहीत नसणे, अशी अनेक कारणे ही युक्ती किंवा हे कारस्थान यशस्वी होण्यामागे आहेत, हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
ड आपल्या विरोधात आर्थिक किंवा अन्य कोणताही गुन्हा नोंद झाला आहे, हे ऐकूनच अनेक माणसे मानसिकदृष्ट्या बधीर होऊन जातात. आता आपल्या अब्रूचे धिंडवडे निघणार, तोंड दाखवायला जागा उरणार नाही, सर्वत्र आपली छी थू होणार, आपली प्रतिष्ठा धुळीस मिळणार, याचा परिणाम आपल्या मुलाबाळांवर आणि इतर कुटुंबियांवर होणार, त्यांचीही समाजात अप्रतिष्ठा होणार, अशा विचारांचे काहूर मनामध्ये उठते. त्यामुळे अनेकजण हताश होतात. त्यांचा अवसानघात होतो. ते मानसिकदृष्ट्या थिजतात आणि कटाला बळी पडतात.
ड पैसे गेले तर पुन्हा मिळवता येतील. पण प्रतिष्ठा गेली तर पुन्हा मिळविता येणार नाही. त्यामुळे रक्कम फेकून सुटका होत असेल तर ते बरेच आहे. कशाला धोका पत्करा, असा विचार अनेकजण करतात. त्यामुळे डिजिटल गुन्हेगारांचे फावते. ते सांगतील त्याप्रमाणे असे लोक करत जातात. त्यांच्या कमजोर मानसिकतेचा अशाप्रकारे लाभ उठविला जातो. सरकारी यंत्रणांसंबंधीची भीती आणि त्यांच्या कार्यपद्धतीसंबंधीचे अज्ञान याचाच लाभ असे गुन्हेगार घेतात असे अशा प्रकारे घडलेल्या आतापर्यंतच्या प्रत्येक प्रकरणात आढळून आले आहे.
कायदा काय म्हणतो...
ड भारताच्या कोणत्याही कायद्यामध्ये, मग ते भारतीय दंड विधान असो, क्रिमिनल प्रोसिजर कोड असो, प्राप्तीकर कायदा असो किंवा कोणत्याही अन्य गुन्हेगारी संबंधी कायदा असो, त्यात ‘डिजिटल अरेस्ट’ किंवा ऑनलाईन अटक असा प्रकार नाही. अशाप्रकारे कोणालाही अटक करता येत नाही, किंवा ताब्यात ठेवता येत नाही. तथापि, बहुतेकांना अटकेसंबंधीच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत, याची माहिती सोडाच, पण जाणीवही असत नाही. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांचे डावपेच यशस्वी होतात. म्हणून अटक केव्हा केली जाते, कशी केली जाते, कोणाकडून केली जाऊ शकते, आदी मुद्द्यांची माहिती प्रत्येकाने करुन घेणे आवश्यक आहे. हे अज्ञानच डिजिटल गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत असते.
फसवणूक कशी टाळावी...
ड कोणीही आपल्याला डिजिटल अरेस्ट केल्याचा कॉल केला असेल तर हे बनावट प्रकरण आहे हे ओळखले पाहिजे. कारण कायद्यात डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही. त्यामुळे कोणीही तसे करु शकत नाही. त्यामुळे अशा कॉल्समुळे घाबरण्याचे कारण नाही, हे प्रत्येकाने जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
ड कोणताही खरा अधिकारी अशाप्रकारे अटक करत नाही. तसेच आपल्या बँक खात्यांची, त्यांच्यात असलेल्या रकमेची माहिती फोन कॉल किंवा व्हिडीओ कॉल करुन विचारत नाही. काही कारणांमुळे सरकारी अधिकाऱ्यांना अशी माहिती हवीच असेल तर ती कायद्यातील नियमांचे पालन करुनच घेतली जाते.
ड डिजिटल गुन्हेगारांच्या वातावरण निर्मितीमुळे, किंवा ते देत असलेल्या धमक्यांकडे कोणीही मुळीच लक्ष देण्याचे कारण नाही. उलट असे कॉल करणाऱ्यांनाच तुम्ही उलटून प्रश्न विचारले आणि असे कॉल केल्याबद्दल खऱ्या पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला, तर तो पुन्हा कॉल करणार नाही.
ड संशयास्पद कॉल आल्यास आणि कॉल करणाऱ्यांने बतावणी केल्यास संबंधित सरकारी विभागाकडे चौकशी करुन आपण या कॉलच्या खरेपणाची पडताळणी करु शकता. आपल्याला आलेला कॉल बनावट आहे, हे तिथल्या तिथेच आपल्या लक्षात येईल आणि नंतर अशा कॉल्सकडे आपल्याला सहजपणे दुर्लक्ष करता येईल.
ड आपल्याला कॉल करणाऱ्यांना आपली व्यक्तिगत माहिती, बँक खाते क्रमांक, खात्यांवर असलेल्या पैसे इत्यादी माहिती चुकूनसुद्धा देऊ नका. असे कॉल कट करणेच श्रेयस्कर असते. मनाची शांतता राखणे आणि घाबरुन न जाणे हे सर्वात महत्वाचे आहे. न घाबरल्यास आपण हे कारस्थान हाणून पाडू शकता.
ड इतकी दक्षता घेऊनही फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्थानकात किंवा सायबर पोलिसांमध्ये त्याची माहिती दिल्यास आपले पैसे परत मिळू शकतात. आपले ट्रान्झॅक्शन रद्द होऊन फसवणूक टळू शकते. मात्र यासाठी वेगाने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. वेळ गेल्यास स्थिती अत्यंत जटील होते.
ड फसवणूक लक्षात येताच आपल्या बँकेला त्वरित कळवून आपण व्यवहार थांबवू शकता. आपले बँक खाते बँकेकडून गोठवून घेऊ शकता. ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर आपण तक्रार नोंदवू शकता. तसे केल्यास त्वरित पुढची कारवाई केली जाऊन आपल्या पैशाचे संरक्षण होण्याची शक्यता वाढते.
ड आपल्याला आलेले संशयास्पद कॉल, धमक्या, इशारे, ट्रान्झॅक्शन्सची माहिती आणि इतर डिजिटल माहितीचे रेकॉर्ड आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. याचा उपयोग पुढे गुन्हेगारांवर कारवाई झाली तर पुरावा म्हणून होऊ शकतो. आपली दक्षता आपणच घेणे हाच या फसवणुकीवर सर्वोत्तम उपाय मानला पाहिजे.
निष्कर्ष
ड सायबर घोटाळे किंवा डिजिटल घोटाळे कसे होतात याची माहिती करुन घेणे ही त्यांच्यापासून संरक्षण करुन घेण्याची पहिली पायरी आहे.
ड आपली व्यक्तिगत माहिती, बँक खात्यांसंबंधी माहिती, आपल्याकडच्या पैशाची माहिती कोणत्याही परिस्थितीत कोणालाही देऊ नये.
ड डिजिटल अरेस्टसंबंधी कॉल आल्यास घाबरुन जाऊ नये. तुमची भीती आणि अज्ञान हेच अशा प्रकारच्या गुन्हेगारांचे सर्वात मोठे भांडवल आहे.
ड फसवणूक झाल्यास न लाजता किंवा दुर्लक्ष न करता त्वरीत सायबर शाखेकडे तक्रार करावी आणि बँकेला कळवून आपले खाते गोठवून घ्यावे.