दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा तालुक्यात जयघोष
विविध ठिकाणी दत्तजयंती भक्तिमय वातावरणात साजरी
वार्ताहर/किणये
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत गुरुवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यंदा गुरुवारच्या दिवशीच दत्तजयंती आली असल्यामुळे भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. दत्त मंदिरांमध्ये श्री गुरुदेव दत्ताची विशेष पूजा करण्यात आली होती. विविध गावांमध्ये असलेल्या दत्त मंदिरांमध्ये भक्तांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरांमध्ये काकड आरती, भजन, प्रवचन कीर्तन असे कार्यक्रम झाले. ‘दत्त दत्त ऐसे लागले ध्यान’ याप्रमाणे तालुक्यात गुरुवारी श्री गुरुदत्तांचा जयघोष झाला. गुरुदेव दत्तच्या गजरात महाआरती करण्यात आली. महिलांनी पाळणागीत म्हणून जन्मोत्सव सोहळा साजरा केला. काही मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.
दत्तनगर पिरनवाडी येथे रविवारी महाप्रसाद
दत्तनगर पिरनवाडी येथील गुरुदेव दत्त मंदिर कमिटीच्यावतीने गुरुवारी दत्तजयंती सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी सागर केरूर भटजी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. दिवसभर भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी श्रींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. रविवार दि. 7 रोजी दुपारी एक ते तीन पर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
इस्कॉनच्या वरिष्ठ भक्तांचा कीर्तन-भगवत कथा कार्यक्रम
जी आय टी कॉलेज रोड, राजाराम नगर उदमबाग येथील श्री गुरुदत्त दिगंबर मंदिरात दत्तजयंती साजरी करण्यात आली. गुरुवारी सकाळी सहा वाजता अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पिरनवाडी येथील धनगर समाजाच्या बांधवांचा ढोल वाजवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. दुपारी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर दीपोत्सव करण्यात आला. सायंकाळी इस्कॉनच्या वरिष्ठ भक्तांचा कीर्तन व भगवत कथा कार्यक्रम झाला.
आज गुरुदत्त याग होम
शुक्रवार दि. 5 रोजी सकाळी सव्वासात वाजता गुरुदत्त याग होम करण्यात येणार आहे. नऊ वाजता महाआरती करण्यात येईल व दुपारी बारा ते तीन या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.