भारतासोबत संबंधांसाठी अवघड काळ
कॅनडाच्या विदेश मंत्र्यांनी दिली कबुली : जयशंकर यांच्या संपर्कात
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या विदेशमंत्री मेलानी जोली यांनी पुन्हा एकदा भारतासोबतच्या संबंधांवरून टिप्पणी केली आहे. द्विपक्षीय संबंधांमधील कटूतेची कबुली देत जोली यांनी याला द्विपक्षीय संबंधांमधील अवघड काळ संबोधिले आहे. भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत सातत्याने संपर्कात असून संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे मेलानी यांनी टोकियो येथील जी-7 विदेश मंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.
भारतासोबतच्या संबंधांवर मी अनेकदा भूमिका मांडली आहे. एस. जयशंकर यांच्या संपर्कात आहे. दशकांपासून चालत असलेल्या संबंधांमध्ये हा अवघड काळ असल्याचे मी जाणून आहे. आम्ही या अवघड काळातून बाहेर पडू असा पूर्ण विश्वास आहे. दोन्ही देशांच्या हितसंबंधांकरता आम्ही मिळून काम करतो. कॅनडा स्वत:चे सर्व मित्र आणि समान विचारसरणी असलेल्या देशांसोबतचे संबंध सुधारू पाहत असल्याचा दावा जोली यांनी केला आहे.
कॅनेडियन राजनयिकांना देण्यात आलेले संरक्षण मागे घेण्यात आल्यानेच त्यांना भारत सोडावा लागला आहे. आम्ही आमच्या राजनयिकांसंबंधीच्या भारताच्या निर्णयामुळे चिंतेत होतो. परंतु भारताच्या या निर्णयावर आम्ही प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निज्जरच्या हत्येवरून तणाव
कॅनडामध्ये जून महिन्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती. निज्जर 18 जून रोजी कॅनडाच्या सरे येथे मारला गेला होता. या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप करत कॅनडा सरकारने चौकशीची मागणी केली होती. कॅनडाच्या या आरोपावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. भारताने सर्व आरोप फेटाळले होते. यानंतरच दोन्ही देशांमध्ये राजनयिक स्तरावर तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सप्टेंबर महिन्यात व्हिसा सेवा स्थगित केली होती. परंतु मागील महिन्यात भारताने सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यावर कॅनडामध्ये चार श्रेणींसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने एंट्री व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडिकल आणि कॉन्फरन्स व्हिसा प्रदान करण्यास सुरुवात केली आहे