इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ?
अफगाणिस्तानचा दावा : पाकिस्तानकडून मात्र इन्कार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा कारागृहामध्ये मृत्यू झाल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. तथापि, पाकिस्तानने हे दावे फेटाळून लावले आहेत. अफगाणच्या दाव्यानंतर मृत्यूबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असतानाच इम्रान खान यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या बहिणींना कारागृहात जाण्यास मनाई करण्यात आली. गेल्या 23 दिवसांपासून कुटुंबाला इम्रान यांना भेटण्याची परवानगी मिळालेली नसल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. याचदरम्यान बुधवारी इम्रान खान यांच्या पक्षकार्यकर्त्यांनी कारागृहाबाहेर निदर्शनेही केली.
माजी पंतप्रधान इम्रान खान 2023 पासून रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात कैद आहेत. पाकिस्तान सरकार आणि लष्कराने तुरुंगात त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांच्या कुटुंबालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही. दरम्यान, अफगाणच्या एका माजी अधिकाऱ्याने इम्रान खान यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. इम्रान खान यांची 17 दिवसांपूर्वी गूढपणे हत्या करण्यात आली असल्याचे पाकिस्तानी लष्करातील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘अफगाणिस्तान डिफेन्स’मधील पोस्टमध्ये इम्रान खान यांची तुरुंगात हत्या करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तथापि, पाकिस्तानने हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. हत्येचे वृत्त खोटे आहे. इम्रान खान जिवंत असून ते तुरुंगात कैद असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
बहिणींना भेटण्यापासून रोखले, समर्थकांची तुरुंगाबाहेर निदर्शने
इम्रान खान यांच्या बहिणी नूरिन खान, अलिमा खान आणि उज्मा खान त्यांना भेटण्यासाठी अदियाला तुरुंगाबाहेर आल्या होत्या. मात्र, त्यांना कारागृहात सोडण्यात आले नव्हते. दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाच्या, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थकांनीही तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन केले. सर्व निदर्शक इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत अहवालाची मागणी करत होते. तथापि, पाकिस्तान सरकारने सर्व निदर्शकांना क्रूर वागणूक दिली. निदर्शकांवर कारवाई करत पंजाब पोलिसांनी अनेक लोकांना ताब्यात घेतले आहे.