हुकूमशाही हीच मोदींची गॅरंटी
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे टीकास्त्र : निपाणीतील सभेसाठी लोटला जनसागर
निपाणी : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ घालवला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश लोकशाही पद्धतीने चालेल असा निर्णय काँग्रेसने घेतला. मात्र गेल्या दहा वर्षात लोकशाही धोक्यात येईल, अशा पद्धतीची वर्तणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुरू आहे. झारखंड राज्यात आदिवासींवर अन्याय होत असल्याबद्दल तेथील मुख्यमंत्र्यांनी मोदींवर टीका केली तर त्यांना तुरुंगात टाकले. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सलग तीनवेळा जनतेने निवडून दिलेल्या आणि शिक्षण, आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती केलेल्या दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या धोरणावर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. सत्तेचा वापर करून हळूहळू हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असून हुकूमशाही हीच मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली.
2014 साली पेट्रोलचे दर प्रतिलिटर 71 रुपयांवर गेल्यानंतर काँग्रेसवर टीका करणाऱ्या मोदींनी सत्तेत आल्यानंतर 50 दिवसात पेट्रोलचे दर कमी करतो म्हणून सांगितले होते. आज 3 हजार 650 दिवस झाले. पेट्रोलचे दर कमी होण्याऐवजी 107 रुपयांवर गेले. काँग्रेसच्या काळात 410 असणारा गॅस 1,160 रुपयांवर गेला. प्रत्येक वर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी दिले. मात्र आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार भारतात 100 पैकी 87 मुलांना नोकरी नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतीचा उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमतही मिळत नसल्यामुळेच नाराज जनतेने कर्नाटक आणि तेलंगणात सत्ताबदल करून देशाला नवा संदेश दिला.
कर्नाटक, तेलंगणामध्ये वचनपूर्ती
महिलांना मानधन, मोफत बसप्रवास, बेरोजगार युवकांना भत्ता, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कर्नाटक व तेलंगणा येथील काँग्रेस सरकारने आश्वासनांची पूर्तता केली आहे. त्यामुळे येथील जनतेने पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत हातासमोरील बटन दाबून भाजपला दूर करावे, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी, सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने गॅरंटी योजना पूर्ण करत गरीब, शेतकरी, महिला व कामगारांसाठी काम केले जात आहे. कर्नाटकात व देशात यंदा इंडिया आघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. महात्मा बसवेश्वर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, देशात वाढत्या महागाईची मोठी झळ महिलांसह सामान्य कुटुंबांना बसत आहे. याला भाजप कारणीभूत असून केंद्रातील भाजप सरकारविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. अशावेळी इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांच्या आदेशानुसार आणि कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. सत्ता असो किंवा नसो पवारांच्या शब्दाला दिल्लीत मोठे वजन आहे. त्यामुळेच मांगूर फाट्यावरील भराव टाकून होणाऱ्या उ•ाण पुलामुळे निर्माण होणारी समस्या पवारांच्या कानी घातल्यानंतर त्यांनी तात्काळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना सूचना करून हे काम थांबवले.
विद्यमान आमदार व खासदार या दाम्पत्याने निपाणी भागात कोणतीही मोठी सुविधा दिलेली नाही. सर्व सोयीनियुक्त सरकारी रुग्णालय, सरकारी महाविद्यालय याची वाणवा आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जनता विद्यमान खासदारांना या निवडणुकीत धडा शिकवणार आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघातून 40 ते 50 हजारांचे मताधिक्य काँग्रेसला मिळवून देणार आहोत. 7 मे रोजी सर्व मतभेद विसरून मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदारांनी काँग्रेस उमेदवारास मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी दलित क्रांतीसेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे, अरुण निकाडे, राजू खिचडे, नानासो पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मंत्री डी. सुधाकर, अभिनंदन पाटील, पृथ्वीराज पाटील, नगरसेवक रवींद्र शिंदे, गोपाळ नाईक, संजय सांगावकर, सतिश पाटील, सुनील पाटील, राजू पाटील, शौकत मनेर, संजय पावले, शेरू बडेघर, उपासना गारवे, शांता सावंत, दिपाली गिरी, चेतन स्वामी, संजय पाटील, शुभांगी जोशी, अनिता पठाडे, विनायक वडे, विष्णू कडाकणे, निरंजन पाटील, बंडा पाटील, सुनील शेलार, महेश पाटील अनिल संकपाळ, प्रा. सचिन खोत, गजानन कावडकर, इम्रान मकानदार, शिरीष कमते यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तळपत्या उन्हातही महिलांची गर्दी
गेल्या काही दिवसात निपाणीचा पारा 40 अंशापर्यंत गेला आहे. सकाळी 10 पासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अशातही बुधवारच्या सभेत सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दहा वाजता मंडप खचाखच भरून तितकेच लोक बाहेर थांबले होते. सकाळी 11.30 सुमारास शरद पवार यांचे सभास्थळी आगमन झाले. तळपत्या उन्हातही महिलांनी केलेली गर्दी लक्षणीय ठरली.
रोजगाराचे विचारले तर हिंदू-मुस्लीम...!
यावेळी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी म्हणाले, देशातील आजचे चित्र पाहिले तर बाबासाहेबांचे संविधान वाचणार की नाही? ही भीती निर्माण झाली आहे. महात्मा बसवेश्वरांनी काम हीच पूजा असल्याचा संदेश दिला. मात्र केंद्रातील भाजपने काम देण्याऐवजी दिलेल्या जीएसटी, नोटबंदीने सहा कोटी लोक बेरोजगार झाले. दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार असल्याच्या आश्वासनाबद्दल विचारताच भारत-पाकिस्तान, हिंदू-मुस्लीम हे मुद्दे घेऊन जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सामान्य जनतेचे कल्याण करण्याची ताकद केवळ काँग्रेस पक्षात असून या निवडणुकीत जनतेने काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून द्यावे, असे आवाहन केले.