क्रिकेट मधील सर्वोत्तम पंच डिकी बर्ड!
हेरॉल्ड डेनिस बर्ड उर्फ डिकी बर्ड हा क्रिकेटमधला एक अवलियाच म्हटला पाहिजे. क्रिकेटच्या खेळात खेळाडूंबरोबरच पंच देखील एक महत्वाचा भाग आहे. सामना कोणताही असो, अगदी क्लब लेव्हलचा सामना असो अथवा टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना, पंचाची भूमिका कायमच महत्वाची असते. अनेक पंचांनी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे, पण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम पंच म्हणून कायमच डिकी बर्ड ह्यांच्याकडे बघितलं जाईल.
डिकी बर्ड ह्यांचा जन्म 19 एप्रिल 1933 रोजी यॉर्कशायर परगण्यातील बार्नस्ले ह्या गावात झाला. त्यांचं खरं नाव हेरॉल्ड, पण शाळेतच त्यांना ‘डिकी‘ हे टोपण नाव मिळालं आणि तेच त्यांना आयुष्यभर चिकटलं. शाळेत असताना त्यांचं पहिलं प्रेम होतं फुटबॉल. ते शाळेच्या संघातून फुटबॉल खेळत असत. पण मग पायाला झालेल्या दुखापतीनंतर ते क्रिकेटकडे वळले. यॉर्कशायरमधील एका क्लबकडून त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून हळूहळू त्यांचा जम बसत होता. त्यांनी 1956 साली काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, आणि साधारण 1964 पर्यंत ते क्रिकेट खेळत राहिले. आधी यॉर्कशायर आणि नंतर लेसिस्टरशायर परगण्यांकडून ते क्रिकेट खेळले. डिकी बर्ड हे एक चांगले फलंदाज होते. पुढे 1966-67 मध्ये त्यांनी काउंटी क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर तीनच वर्षांनी म्हणजे 1970 साली त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पंच म्हणून पदार्पण केले. 1970 ते 1996 ह्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय पंच म्हणून कारकिर्दीत त्यांनी 66 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून काम पाहिले. आजच्या काळात ही संख्या कदाचित कमी वाटेल, पण डिकी बर्ड ह्यांचे क्रिकेटमधील योगदान कोणत्याही संख्येपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. डिकी बर्ड पहिल्या तीनही विश्वचषक स्पर्धेत (1975, 1979 आणि 1983) अंतिम सामन्यात पंच म्हणून उभे होते. 1987 साली देखील त्यांना अंतिम सामन्यात पंच म्हणून काम करायची इच्छा होती, पण त्यावेळी त्या स्पर्धेसाठी सामन्यात त्रयस्थ पंच असावेत असा नियम होता. (जो त्या आधीच्या स्पर्धांमध्ये नव्हता.) 1987 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे त्यांना ह्या सामन्यात पंच म्हणून उभे राहता आले नाही. विशेष म्हणजे, प्रतिस्पर्धी संघाचा-ऑस्ट्रेलियाचा कप्तान अॅलन बॉर्डर ह्याने त्या सामन्यासाठी डिकी बर्ड पंच असावेत अशी मागणी केली होती, परंतु ती मागणी पूर्ण होऊ शकली नाही. प्रतिस्पर्धी संघानेच त्यांच्यासाठी अशी भूमिका घेणे हेच त्यांचे खरे कौतुक आहे.
डिकी बर्ड खेळाडूंमध्ये किती प्रसिद्ध होते, आणि खेळाडू त्यांना किती मान देत असत ह्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो. डिकी बर्ड ह्यांच्या निवृत्तीनंतर काही वर्षांनी बीबीसीने त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्री करायचे ठरवले होते. त्यावेळी त्यांनी अनेक खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या. त्यात इंग्लंडमधील अनेक खेळाडू (उदा. जेफ्री बॉयकॉट, डेव्हिड गॉवर, ग्रॅहम गूच, इयान बोथम इ.) होतेच, पण इतर देशातूनही अनेक खेळाडू - सोबर्स, रिचर्ड्स, चॅपेल बंधू, रिचर्ड हॅडली, इम्रान खान, सुनील गावस्कर ह्यांनी त्या डॉक्युमेंट्रीसाठी आपला वेळ दिला होता. इतकंच नाही, तर त्यावेळचे ब्रिटनचे पंतप्रधान जॉन मेजर ह्यांनीदेखील आपल्या कार्यालयीन कामातून वेळ काढून त्या डॉक्युमेंट्रीमध्ये भाग घेतला होता. डिकी बर्ड ह्यांच्याविषयी असलेला आदर आणि प्रेम ह्यामुळेच हे घडू शकलं.
डिकी बर्ड ह्यांनी पंच म्हणून काम करताना कायमच क्रिकेटच्या नियमांना प्राधान्य दिलं. 1980 मध्ये लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांमध्ये सेन्टेनरी (शतकमहोत्सवी) कसोटी सामना होणार होता. दोन्ही क्रिकेट बोर्ड्स, संघ आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने देखील हा एक महत्त्वाचा सामना होता. त्या सामन्यात डिकी बर्ड पंच म्हणून काम करत होते. सामना सुरू होण्यासाठी दोन्ही संघ पहिल्या दिवशी मैदानावर आले. आदल्या दिवशी पाऊस पडून गेला होता. त्या दिवशी खेळपट्टी ठीकठाक असली तरी मैदान अजूनही ओलसर होतं. क्रिकेट बोर्ड आणि दोन्ही कप्तान सामना सुरू व्हावा ह्यासाठी राजी होते, पण डिकी बर्ड ह्यांनी नियमांवर बोट ठेवत, मैदान ओलं असल्याने खेळ सुरू करण्यास नकार दिला. मैदान व्यवस्थित सुकल्यानंतर दुपारी त्यांनी खेळ सुरू करण्यास परवानगी दिली. कोणत्याही सामन्याचे, कोणत्याही खेळाडूचे अथवा क्रिकेट बोर्डाचे देखील दडपण त्यांनी कधीही घेतले नाही. त्यांच्यासाठी क्रिकेटची नियमावली सगळ्यात महत्त्वाची होती. क्लब दर्जाचा सामना असो अथवा कसोटी सामना असो, ते कायम 4-5 तास आधी मैदानावर येत असत. मैदानाची पाहणी, खेळपट्टीची पाहणी, मैदानावर काम करणारे कर्मचारी (ग्राउंड स्टाफ) आणि इतर मदतनीस ह्यांच्याबरोबर गप्पा आणि सामना सुरू होण्याच्या आधी एक गरम चहाचा कप हा त्यांच्या दैनंदिनीचा भाग असे. ते कायमच सर्वांशीच अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने वागत, आणि कदाचित त्यांच्या ह्याच गुणांमुळे देशोदेशीचे खेळाडू, अधिकारी, प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमी त्यांना आदर देत असत. डिकी बर्ड पंच म्हणून काम करत असतानाच टीव्ही अंपायर (ऊप्ग्rd ळस्ज्ग्rा) ची सुरुवात झाली होती. क्रिकेटच्या खेळात डिकी बर्ड ह्यांनी तंत्रज्ञानाला कायमच विरोध केला. हे तंत्रज्ञान क्रिकेटसाठी नाही असे त्यांचे मत होते. मैदानावरील पंच कोणतेही निर्णय अचूक देण्यास पात्र असावा अशीच त्यांची कायम भूमिका होती.
डिकी बर्ड ह्यांची टोपी देखील खूप प्रसिद्ध होती. ते नेहमीच वेगळ्या पद्धतीची टोपी वापरत असत. 1975 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर अनेक प्रेक्षक मैदानावर धावत आले आणि त्यानंतर झालेल्या गोंधळात एका प्रेक्षकाने त्यांची ती आवडती टोपी पळवली. पुढे वर्षभरानंतर डिकी बर्ड लंडनमधे बसने प्रवास करत असताना बसमधील कंडक्टरच्या डोक्यावर त्यांना ती टोपी दिसली. त्यांनी त्या कंडक्टरकडे विचारणा केल्यानंतर कंडक्टरने मोठ्या अभिमानाने आपण ती टोपी लॉर्ड्स मैदानावर डिकी बर्ड ह्यांच्या डोक्यावरून पळवल्याचे सांगितले होते. 1996 साली इंग्लंड आणि भारत संघात लॉर्ड्स मैदानावर झालेला कसोटी सामना हा डिकी बर्ड ह्यांचा शेवटचा कसोटी सामना होता. डिकी बर्ड ह्यांनी निवृत्त झाल्यानंतर ‘My Autobiography‘ ह्या नावाने स्वताचे आत्मचरित्र लिहिले. तसेच पुढे त्यांनी लिहिलेले ‘`White Caps and Bails-Adventures of a much travelled umpire‘ हे पुस्तक देखील खूप गाजले. 2009 साली त्यांचे यॉर्कशायरमधील गाव बार्नस्ले येथे त्यांचा मोठा सहा फुटी पूर्णाकृती पुतळा उभारला गेला. जगातील सर्वोत्कृष्ट पंचाला त्याच्या जन्मगावाने दिलेली ही खरी मानवंदना म्हटली पाहिजे. डिकी बर्ड ह्यांनी वयाची नव्वदी गाठली होती. हॅरोल्ड डेनिस उर्फ डिकी बर्ड हे कायमच क्रिकेटच्या जगात आदराचं व्यक्तिमत्व असेल, खेळाडूंसाठी आणि क्रिकेट रसिकांसाठी देखील.