For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नवा सोमवार’ उत्सवासाठी डिचोलीवासीय सज्ज

12:16 PM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘नवा सोमवार’ उत्सवासाठी डिचोलीवासीय सज्ज
Advertisement

घरे, मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई : मुंबईसह स्थानिक गायकांच्या मैफिली 

Advertisement

डिचोली : येथील श्रीदेवी शांतादुर्गेचा प्रसिद्ध ‘नवा सोमवार’ उत्सव गावकरवाडा डिचोली आणि आतीलपेठ डिचोली येथे आज सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यासाठी डिचोली नगरी सज्ज झाली आहे. पालखीतून निघणाऱ्या देवीच्या स्वागतास डिचोलीतील भाविक सज्ज झाले आहेत. सर्व घरांवर व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रस्त्यांच्या बाजूने फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. सारे वातावरण उत्साही तसेच भक्तिमय होऊन गेले आहे. गावकरवाडा डिचोली येथील देवी श्री शांतादुर्गेच्या मंदिरात ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे आज दिवसभर विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री देवीची पालखी निघणार आहे. आतीलपेठ डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मठमंदिरात श्री शांतादुर्गा देवस्थान नवा सोमवार उत्सव समितीचा हा यावषीचा उत्सव श्री देवी शांतादुर्गा देवस्थान बाजारकर दहाजण मंडळातर्फे साजरा होणार आहे. त्यानिमित्त मठमंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी व इतर कार्यक्रम होतील. रात्री पालखी भाविकांच्या भेटीसाठी निघणार आहे.

गावकरवाडा येथून पालखी मिरवणूक

Advertisement

डिचोली येथील ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे श्री शांतादुर्गा देवीचा नवा सोमवार उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक तसेच गायनाच्या मैफली आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. उत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी. दुपारी आरती व तिर्थप्रसाद, रात्री 9 वा.  शांतादुर्गा भजनी मंडळ, भांबर्डे तसेच हनुमान बँड पथक यांच्या संगतीने पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

गावकरवाडा येथे गायनाच्या मैफली

गावकरवाडा येथे पहिली गायन मैफल रात्री 10 वाजता देवीच्या प्रांगणात होणार आहे. समृद्ध चोडणकर प्रस्तुत ‘ओंकार अनादी अनंत’ या भाव, भक्ती, नाट्यागीतांच्या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार विश्वजित बोरवणकर (मुंबई), अस्मिता धापटे हे कलाकार गायन करतील. संगीता जोशी निवेदन करणार आहेत. दुसरी संगीत बैठक रात्री 1.30 वा. श्री रवळनाथ मंदिर प्रांगणात होणार आहे.  ‘सुर गंगा मंगला’ या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक कैलास खरे (मुंबई), प्राजक्ता काकतकर यांचे गायन सादर होणार. अमेय रानडे निवेदन करतील.

आतीलपेठ येथील उत्सव

आतीलपेठ येथील यावषीचा उत्सव आतीलपेठ दहाजण बाजारकर मंडळातर्फे  साजरा होणार आहे. मठमंदिरात सकाळी धार्मिक विधी, नंतर सकाळी 9 ते रात्री पालखी मंदिरात येईपर्यंत ओटी फुले नारळ आदी साहित्य स्वीकारण्यात येईल. श्री देवी शांतादुर्गेची पालखी रात्री 8 वा. मठमंदिरातून बाहेर निघेल व श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ भाविकांसाठी रात्री 10 पर्यंत ठेवली जाणार आहे. या दरम्यान तेथे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वा. बँड पथकासह पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. पालखी आतीलपेठ, सोनारपेठ, भायलीपेठ व बोर्डे वडाकडेपर्यंत जाऊन माघारी फिरणार आहे. पालखी मंगळवारी मंदिरात दाखल झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होईल.

गायनाच्या संगीत मैफली

आतीलपेठ मठमंदिरात गायनाची पहिली बैठक रात्री 10 वाजता होणार आहे.  यात  गायक भाग्येश मराठे (मुंबई)  व गायिका श्रुती मराठे (मुंबई) यांचे गायन  होईल. त्यांना प्रणव गुरव, वरद सोहनी संगीतसाथ करतील. दुसरी बैठक रात्री 11 वा. गुरूफंड ट्रस्ट भायलीपेठ येथे होणार असून स्थानिक कलाकार अन्सिका नाईक, गणेश मेस्त्री यांचे गायन होईल. त्यांना चांगदेव नाईक, ओमप्रकाश गावस, विराज गावस, सुरेश घाडी संगीतसाथ करतील, संजय सालेलकर निवेदन करतील. गेल्यावषी कोविडच्या धास्तीमुळे हा उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. फेरीवाल्यांनी मर्यादित स्वरूपात दुकाने थाटली होती. तसेच मठमंदिरातील पालखी मिरवणुकीत भाविकांच्या ओट्या स्वीकारण्यात आल्या नव्हत्या. यावषी हा उत्सव मोठ्या उत्साहाने व थाटामाटात साजरा करण्यात हेणार असल्याने डिचोलीत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

Advertisement
Tags :

.