डिचोली पोलिसस्थानक देशात पाचव्या क्रमांकावर
सर्व निकषांमध्ये केली अव्वल कामगीरी : 17532 स्थानकांमधून झाली निवड
डिचोली : केंद्र सरकारच्या गृह कल्याण मंत्रालयातर्फे देशभरातील उत्कृष्ट पोलिसस्थानक निवडण्यासाठी देशपातळीवर केलेल्या सर्वेक्षणात डिचोली पोलिसस्थानक पाचव्या क्रमांकावर आले आहे. हे सर्वेक्षण देशभरातील 17532 पोलिस्थानकांमधून करण्यात आले होते. या राष्ट्र पातळीवरील कामगिरीबद्दल डिचोली पोलिसस्थानकाचे तसेच निरीक्षक विजय राणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनीही डिचोली पोलिसस्थानकाचे अभिनंदन केले आहे.
डिचोली पोलिसस्थानकाने चालू वर्षात स्थानकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या तक्रारी व गुह्यांमध्ये तपासकाम यात ठेवलेले सातत्य व मिळविलेले यश या निकषांवर या पोलिसस्थानकाची पहिल्या दहा पोलिसस्थानकांमध्ये निवड झाली होती. गेल्या वर्षभरात डिचोली पोलिसस्थानकात नोंदविण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारी व गुह्यांवर डिचोली पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, हवालदार, कॉन्स्टेबल व इतर कर्मचारी मोठ्या आत्मीयतेने व आत्मविश्वासाने कार्य करीत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.
गुन्ह्यांचे यशस्वी तपासकाम
आपल्या हद्दीत आतापर्यंत झालेल्या 3 खून प्रकरणांचा यशस्वी छडा डिचोली पोलिसांनी लावला आहे. त्याचप्रमाणे खुनीहल्ला, बलात्कार, विनयभंग, हीट अँड रन, आर्थिक फसवणूक, जीएसटी चोरी, ऑनलाइन खरेदी विक्रीत गैरव्यवहार, गोव्यात गाजलेल्या एटीएम मशीनमध्ये फसवणूक व पैशांची अफरातफर, चोरी या राज्य पातळीवर रॅकेटचा पर्दाफाश डिचोली पोलिसस्थानकाने केला होता. त्याचबरोबर लहान मोठे गुन्हे नोंदवून घेत पीडितांना न्याय वेळेत देण्याचे काम घडत आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणांमध्ये डिचोली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
अंमलीपदार्थ विरोधात योग्य कार्य
या चौकशी, तपासणी व छडा लावण्याच्या कामांबरोबरच पोलिसस्थानक व परिसर अत्यंत नीटनेटका व स्वच्छ राखण्यात पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. त्याचबरोबर अंमलीपदार्थ विरोधी अनेक कारवायाही करताना आतापर्यंत अनेक ड्रग्स पॅडलर्सना जेरबंद केले आहे. अंमलीपदार्थ विरोधात योग्य जनजागृती करून युवा तसेच विद्यार्थीवर्गाला मार्गदर्शन केले आहे. नशा मुक्ती, वाहतूक नियमांचे पालन, सर्वत्र काटेकोर नाकाबंदी, बंदोबस्त, विविध ठिकाणी आवश्यक गस्त, डिचोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत होणारे विविध सण उत्सव यामध्ये चोख बंदोबस्त व लोकांना सुरळीत उत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणे, डिचोली साखळी बाजारात तसेच इतर ठिकाणी वेळच्यावेळी गस्त घालणे, तालुक्यातील विविध बँका, सहकारी संस्था यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे, देवस्थान तसेच इतर संस्थांबरोबर संवाद साधून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही डिचोली पोलिस्थानकाने आतापर्यंत मोठी कामगिरी बजावली आहे.