For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दमदार पावसाने डिचोली, सांखळीत पूरस्थिती

06:13 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
दमदार पावसाने डिचोली  सांखळीत पूरस्थिती
Advertisement

वाळवंटीच्या पातळीत वाढ, डिचोली नदीचीही पातळी वाढली

Advertisement

       डिचोली. प्रतिनिधी

गेल्या 1 ऑगस्ट रोजी डिचोली व साखळीत आलेल्या पुरानंतर काहीसा कमी झालेल्या पावसाने काल शनिवारी जोर धरल्याने तळाशी पाणी पोहोचलेल्या नद्यांची पातळी वाढली. वाळवंटी नदीच्या पातळीत बरीच वाढ होऊन पाणी नदीबाहेर पोहोचले होते. त्यामुळे पंपिंग सुरू करण्यात आले होते. डिचोली नदीलाही बरेच पाणी आले होते. संध्याकाळी वाळवंटीच्या पाण्याची पातळी घटल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती.

Advertisement

गेले काही दिवस पावसाने बरीच उसंत घेतली होती. पाऊस गायबच होऊन कडक उन्हाचा लोकांना सामना करावा लागला होता. सदर कडक उन्हामुळे असह्य उकाडाही होत होता. त्यामुळेही लोक बरेच त्रस्त झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला होता.

शुक्रवारी संध्याकाळनंतर पावसाने जोर धरला होता. काल शनिवारी सकाळपासून तर पावसाने कहरच केला. सकाळच्या सत्रात तर पावसाने अक्षरश: डिचोली तालुक्याला झोडपून काढले. सकाळी शाळा हायस्कूल्ससाठी बाहेर पडलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांची तसेच नोकरी, व्यवसायासाठी निघालेल्या लोकांचीही धांदल उडाली. पावसाने अचानकपणे जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

सांखळीतील वाळवंटीच्या पातळीत वाढ

सांखळीतील वाळवंटी नदी परिसरात लगेच पूरस्थिती निर्माण झाली. विर्डी महाराष्ट्र, केरी सत्तरीच्या डोंगर भागात जोरदार पाऊस सुरूच होता. त्यामुळेही वाळवंटी नदीला बरेच पाणी आले होते.  बाजारातील नाल्यात साचणारे पाणी पंपिंग करून बाहेर फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. नदीची पातळी दुपारी 3.5 मीटरपर्यंत पोहोचली होती. तर बाजारातील नाल्याची पातळी 3.9 मीटर्स इतकी झाली होती. दुपारी नदीलाही भरती असल्याने पाणी झपाट्याने वाढत होते. संध्याकाळी भरती ओसरू लागल्यानंतर पुराचेही पाणी घटू लागले होते. संध्याकाळी नदीतील पाणी पातळी नियंत्रणात होती.

गेल्या 1 ऑगस्ट रोजी मुसळधार व सततपणे पडणाऱ्या पावसामुळे सांखळीत पूर आला होता. काजीवाडा, बंदिरवाडा विठ्ठलापूर या भागात घरांमध्ये पाणी घुसले होते. तर एका घरामध्ये तीन व्यक्ती अडकूनही पडल्या होत्या. या पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले होते. काजीवाडा येथे दोन चारचाकी वाहने पाण्याखाली गेली होती. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत पुराचे पाणी ओसरले होते. त्यानंतर पाऊस भरपूर पडला, पण पूरस्थिती निर्माण झाली नव्हती.

 डिचोली नदीचीही पातळी वाढली

डिचोलीतही या पावसामुळे नदीत पाण्याची पातळी बरीच वाढली होती. डिचोलीच्या नदीचीही पातळी तळाशी पोहोचली होती. पण शुक्रवारपासून जोरदारपणे कोसळलेल्या पावसामुळे शनिवारी (दि. 24) सकाळी नदीच्या पातळीत वाढ झाली होती. तर काल शनिवारी सकाळीच डोंगरमाथ्यावर जोरदार वृष्टी झाल्याने डिचोली नदीच्या पातळीत आणखी वाढ झाली. संध्याकाळपर्यंत या नदीची पातळी वाढलेलीच होती.

रात्रभर पाऊस पडल्यास पुराची शक्यता

सध्या डिचोली तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पातळीत बरीच वाढ झालेली आहे. सर्व नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रात्रभर जोरदार पाऊस पडल्यास डिचोली व सांखळीत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने डिचोली जलस्रोत खात्याचे अभियंता परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

Advertisement
Tags :

.