मधुमेहाचे रुग्ण कर्नाटकात अधिक
प्रत्येक 10 पैकी 6 जणांत लक्षणे, कार्बोहायड्रेट्स अतिसेवनाचा परिणाम
बेळगाव : जीवघेणा नसला तरी आयुष्यभर पथ्ये पाळण्यास लावणारा मधुमेह एकेकाळी वयाची सत्तरी ओलांडलेल्या पुरुष-महिलांत दिसून येत होता. आज तो लहान-वृद्ध सर्वांमध्ये दिसून येत आहे. आनुवंशिकता, व्यायामाचा अभाव ही त्याची ढोबळमानाने कारणे सांगता येतील. मधुमेह हा केवळ आनुवंशिकता किंवा व्यायामाच्या अभावाने होत नाही तर चुकीच्या आहार पद्धती, तणावग्रस्त जीवन यामुळेसुद्धा होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.कर्नाटकात मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे धक्कादायक वृत्त नुकतेच हाती आले आहे. टाईप-2 डायबेटीस अर्थात हा तीन वर्षीय मुलांमध्येही आढळून येत आहे. प्रत्येक 10 मुलांमध्ये 6 मुले ही टाईप-2 प्रकारात मधुमेहग्रस्त असतात.
डायबेटीसमधील टाईप-1 हा प्रकार एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासूनच आलेला असेल तर पुढे त्याला टाईप-2 डायबेटीस निश्चितच होऊ शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने 90 ते 95 टक्के लोक टाईप-2 मधुमेहाने ग्रस्त असल्याचे दिसून येतात. यापूर्वी 50 वर्षांनंतर मधुमेह होतो असा समाजात समज होता. मात्र, काहींना आनुवंशिकपणे म्हणजे वडिलांपासून मुलाला किंवा आईपासून मुलाला होत आहे. 20 ते 30 वयोगटातील मुले आज मधुमेहाचे रुग्ण असून युवावर्गाला ही बाब निश्चितच धक्कादायक आहे. मधुमेह नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमानुसार (एनपीसीडी) कर्नाटकात 35 ते 40 टक्के रुग्णांमध्ये मधुमेहग्रस्त दिसून येतात. गेल्या पाच एक वर्षात मधुमेह रुग्णांचे प्रमाण वाढत असून यात मुलांचे प्रमाणही अधिक आहे. खेळ, व्यायामासाठी मुलांना वेळच मिळत नाही. फावल्या वेळेत मुले मोबाईल, टीव्हीच्या जंजाळात अडकलेली असतात. त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक वाढ व्यवस्थित झालेली दिसत नाही. खुजी मुले, लठ्ठपणा हे आजच्या मुलांमध्ये अधिक दिसून येते.
कर्नाटक तिसऱ्या स्थानावर
गेल्या तीन वर्षांत कर्नाटक राज्यात लाखाहून अधिक र्लेकांमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसून आल्याचे भारतीय वैद्यकीय विज्ञान संशोधन संस्थेने (आयसीएमआर) म्हटले आहे. त्याशिवाय मधुमेहाची लक्षणे दिसून येणाऱ्या राज्यांपैकी कर्नाटक हे तिसऱ्या स्थानावर असल्याचे आयसीएमआरच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
...तर मधुमेहापासून दूर
योग्य आहार-विहार, नित्यनेमाने व्यायाम, हसत-खेळत जीवन जगणे, तणावाला थारा न देणे ही जीवनशैली अवलंबिल्यास मधुमेहापासून दूर राहता येणे शक्य आहे, असे तज्ञ म्हणतात.
मधुमेह होण्याची कारणे...
- कार्बोहायड्रेट्सच्या आहारांचे अतिसेवन
- प्रक्रिया केलेल्या आहारांचा अतिवापर
- तणावपूर्ण जीवनशैली
- शारीरिक कष्ट-व्यायामाचा अभाव