हार्टफुलनेसतर्फे ध्यान धारणा-बासरी वादन
प्रतिनिधी/ बेळगाव
हैदराबाद येथील हार्टफुलनेस अर्थात कान्हा शांतीवनच्या बेळगाव शाखेतर्फे शनिवारी ध्यान धारणा व बासरी वादन असा संयुक्त कार्यक्रम झाला. क्लब रोड येथील इफा हॉटेलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या ध्यान प्रशिक्षणामध्ये 60 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. पुढील दोन दिवस हे ध्यानसत्र चालणार आहे. यावेळी हार्टफुलनेसच्या प्रशिक्षिका प्रिया खटाव यांनी ध्यान प्रशिक्षण दिले.
मन, शरीर, मानसिक संतुलनासाठी 15 वर्षांवरील सर्वांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. हार्टफुलनेस मेडिटेशन ट्रेनिंग जगभरातील 160 देशांमध्ये 17 हजार स्वयंसेवकांद्वारे विनामूल्य दिले जात आहे, अशी माहितीही देण्यात आली. या प्रसंगी स्वयंसेवक सचिन अणवेकर, श्रीकृष्ण रायकर, श्रीकांत, सुश्री निलोफर, श्वेताप्रिया नाईक, विजय मोरे, संतोष ममदापुरे, वसंत बालिगा आदी उपस्थित होते. ध्यान सत्रानंतर धारवाड येथील बासरी वादक अब्दुल्ला शेख काझी यांनी आपल्या बासरी वादनाने रसिकांना रिझविले. त्यांना तबल्यावर नारायण गणाचारी यांनी साथ दिली.