आजपासून मुंबई ठाण्यात धुरळा
मुंबई आणि ठाण्यातील लोकसभा निवडणूका या शेवटच्या टप्प्यात 20 मे ला मतदान होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या होम पिचवरच्या या निवडणूका असल्याने आत्तापर्यंत चार टप्प्यात सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्यांची फायनल ही मुंबई ठाण्यात होणार आहे. प्रचाराची पातळी खाली गेल्याने आता पुढील पाच दिवस एकामागून एक गौप्यस्फोट होण्याची शक्यता असून, काही दिवस लोकांचे मात्र मोफत मनोरंजन होणार आहे.
गेल्या चार टप्प्यात राज्यात प्रचारासाठी आलेल्या नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यातील नेत्यांवर आरोप केले. राज्यातील राजधानीत होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील बडे नेते जरी मुंबईत येणार असले तरी या प्रचारातील विषय मात्र स्थानिक पातळीवरील असणार आहेत. मुंबईतील मराठी गुजराती भाषिक वाद, त्याच बरोबर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा असलेला डाव, कोरोना काळातील महापालिकेतील भ्रष्टाचार यावऊन जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला म्हणजेच उध्दव ठाकरे यांनी अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द हा नेहमीचा आणि एकमेकांवर अविश्वास दाखवण्यासाठी कायम चर्चेत राहणारा मुद्दा असल्याने यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने याचे भांडवल केले जाऊ शकते. अमित शहा यांनी राज्यातील एका प्रचार सभेत राष्ट्रवादी शरद पवारांचे मुलीवर असलेल्या प्रेमामुळे तर शिवसेना उध्दव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे फुटल्याचा आरोप केला. शहा यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांनी भारत क्रिकेट वर्ल्ड कप तुमच्या मुलामुळे हरल्याचे विधान केले तर संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना वारंवार औरंगजेब यांच्याशी करताना मोदी आणि शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई आणि ठाण्यात होत असलेली ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थानी असणार आहे.
यापूर्वी ठाणे महापालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बोलताना काही कौटुंबिक खुलासे करताना बटाटा वडा आणि चिकन सुपचा संदर्भ देत उध्दव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले होते. ठाण्यात आता आनंद दिघे यांच्यासोबत त्याकाळी असलेल्या राजन विचारे, नरेश म्हस्के, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यात दिघे साहेबांच्या कार्याचा उल्लेख करत वाद सुरू झाला आहे. शिवसेनेचे ठाकरे गटातील ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे, नरेश म्हस्के यांच्यावर आरोप केले, तर दुसरीकडे धर्मवीर चित्रपटातील दृश्यावऊनही वाद सुरू झाले असून या आठवड्यात अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची पहिली सत्ता ही ठाणे महापालिकेत आली त्यामुळे ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे अशा घोषणा दिल्या जात असत, मात्र आता ठाण्यातच शिवसेना विरूध्द शिवसेना असा संघर्ष पहिल्यांदा होत असल्याने ठाणे कोणत्या शिवसेनेचे हे 20 मे च्या यंत्रात बंद होणार आहे. मुंबईतील सहा जागांवर होत असलेल्या निवडणूकांचा विचार करता, भाजप आणि दोन्ही शिवसेना यांच्यातच खरी लढत होणार असून भाजपसोबत 2019 लोकसभा निवडणुकीपर्यंत असलेली उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि आता सोबत असलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना, या दोन्हीपैकी कोणाला जनता मतांचा आशीर्वाद देते यावरच शिंदे यांच्या सेनेचे पुढील भवितव्य अवलंबुन असणार आहे. शिवसेना भाजपसोबत युतीत असताना उध्दव ठाकरे यांच्या वाट्याला मुंबईतील 3 जागा येत असत आणि भाजपच्या वाट्याला तीन, दोघांच्या जागा पण कायम ठरलेल्या असत, मात्र यावेळी महाआघाडीत ठाकरे यांची शिवसेना मुंबईत चार जागांवर, तर भाजप तीन जागेवर कायम आहे. ठाण्यात ठाणे, पालघर आणि कल्याण या जागेवर ठाकरे गटाची शिवसेना लढत आहे, तर शिंदे गट ठाणे आणि कल्याण तर भाजप भिवंडी आणि पालघर या दोन जागा लढवत आहे.
या सर्व दहा जागांचा विचार करता सध्या तरी उध्दव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक 7 जागांवर लढत आहे तर त्या खालोखाल भाजप आणि शिंदे गट शिवसेना प्रत्येकी पाच जागा लढवत आहेत. ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीनंतरही मुंबई आणि ठाण्यात भाजपपेक्षा जास्त जागा लढण्याचा घेतलेला निर्णय 7 पैकी 5 ठिकाणी धनुष्यबाण विरूध्द मशाल असा थेट सामना होत आहे. त्यामुळे मुंबईत आवाज कुणाच्या शिवसेनेचा? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकीकडे मतांचा पाऊस पाडण्यासाठी सारे पक्ष जोरदार तयारी करत असताना, सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील काही भागात चांगलीच तारांबळ उडाली. निवडणुकीच्या तोंडावर अचानक आलेल्या पावसाचा मतांचा पाऊस पाडण्यासाठी कसे भांडवल करता येईल हे राजकीय पक्षांना चांगलेच माहीत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबरोबर मुंबईतील मान्सूनपूर्व नालेसफाईबरोबर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचासुध्दा शुभारंभ होणार आहे.
प्रवीण काळे