महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावच्या वेशीवर गजराजाचे धुमशान

10:36 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेकिनकेरे, कंग्राळी बुद्रुक भागात दिवसाढवळ्या हत्तीचे दर्शन : वाहनांची मोडतोड, नागरिक-शेतकऱ्यांची घाबरगुंडी, वनखात्याची तत्पर कारवाई

Advertisement

बेळगाव : मागील चार दिवसांपासून मुक्त संचार करणाऱ्या हत्तीने शुक्रवारी बेकिनकेरे गावात भरदिवसा धुमाकूळ घातला. शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता अलतगा येथे प्रथमत: हत्तीचे दर्शन झाले. त्यानंतर हत्तीने कंग्राळी बी.के., शाहूनगर, बॉक्साईट रोड, कंग्राळी खुर्द या भागात मुक्त संचार केला. त्यानंतर कंग्राळी खुर्द, अगसगा शिवारातून बेकिनकेरेच्या दिशेने कूच केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली. गावात आलेल्या हत्तीला वनविभागाने गावापासून जवळ असलेल्या डोंगर परिसरात पिटाळून लावल्यामुळे ग्रामस्थांची तात्पुरती सुटका झाली आहे. तरीही बेळगाव शहराच्या वेशीवरील गावांमध्ये जंगली हत्ती पोहोचल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मागील आठवडाभरापासून बेकिनकेरे, बसुर्ते, अतिवाड परिसरात फिरणाऱ्या हत्तीने शुक्रवारी सकाळी अलतगा, कंग्राळीपर्यंत मजल मारली होती. पहाटे अलतगा फाट्यावर हत्तीचे दर्शन झाले होते. त्यानंतर वनखात्याने तातडीने दाखल होऊन हत्तीला हुसकावून लावण्यासाठी मोहीम हाती घेतली. त्यानंतर हत्ती बेकिनकेरे गावच्या शिवाराकडे मार्गस्थ झाला. दरम्यान, हत्ती गावात घुसून गोंधळ माजवेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. वनखात्याच्या टीमने बंदोबस्त वाढवून हत्तीला गावच्या बाहेरून जाण्यासाठी भाग पाडले. मात्र, हत्ती गावाशेजारी असलेल्या घराजवळून गेल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पुन्हा हत्ती डोंगरातून खाली येऊ नये, यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर डोंगर परिसरात तळ ठोकला होता. वनखात्याचे कर्मचारी हत्तीच्या मागावर होते. कोणतीही हानी होऊ नये, यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे गावागावातून आणि शिवारातून सावध राहण्यासाठी सूचना करत होते. शिवाय गावाबाहेर पडू नये, अशी खबरदारी घ्यावी, अशीही दवंडी देत होते.

Advertisement

भरदिवसा गावात हत्तीचा धुमाकूळ

हत्ती गावात आल्याचे समजताच ग्रामस्थांची धावपळ उडाली. भरदिवसा हत्ती गावात आल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी आरडाओरड करून गोंधळ घातला. याचदरम्यान लोकांना कोणतीही इजा पोहोचू नये, यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना घरातच राहण्याची सूचना केली. मात्र, काही अतिउत्साही तरुणांमुळे हत्तीला पिटाळून लावण्यात अडचणी येत होत्या.

लक्ष्मी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात हत्तीचा गोंधळ

मागील चार दिवसांपासून गावात जीर्णोद्धार करण्यात आलेल्या लक्ष्मी मंदिराचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम सुरू आहे. शुक्रवारी लोकार्पण सोहळा व महाप्रसादाने सांगता झाली. यासाठी पै-पाहुणे मोठ्या संख्येने गावात दाखल झाले होते. त्यातच सकाळपासूनच हत्तीचा धुमाकूळ सुरू झाल्याने गावात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पै-पाहुणे देखील हत्तीच्या वावरामुळे भयभीत झाले होते.

वाहनांचे नुकसान

गावात आलेल्या हत्तीने दुचाकी, बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचे नुकसान केले आहे. घराशेजारी लावलेली दुचाकी हत्तीने आपल्या सोंडेने फेकून दिल्याने तिचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बैलगाडीचीही मोडतोड केली आहे. तर ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून टाकली आहे. त्यामुळे वाहनचालकांना फटका बसला आहे.

सुदैवाने जीवितहानी नाही

बेकिनकेरे गावात आलेल्या हत्तीमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हत्ती शांतपणे मार्गस्थ झाला असला तरी किरकोळ नुकसान झाले आहे. शिवारात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना हत्तीला गावातून बाहेर काढण्यात यश आले.

चाळोबा गणेश नावाचा हत्ती असावा

मागील चार दिवसांपासून विविध गावांमध्ये आणि शिवारांमध्ये मुक्तपणे फिरत असलेला आणि बेकिनकेरे गावात भरदिवसा धुमाकूळ घातलेला हत्ती हा चाळोबा गणेश नावाने ओळखला जाणारा हत्तीच असावा, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. हा आजरा येथील डोंगर परिसरातील हत्ती आहे. मागील काही दिवसांपासून सीमाहद्दीतील गावांमध्ये त्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे या हत्तीचा बंदोबस्त महाराष्ट्र वनखाते करणार की कर्नाटक वनखाते करणार? असा संभ्रमही निर्माण झाला आहे.

तातडीने बंदोबस्त करावा

सीमाहद्दीतील बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते आणि चंदगड तालुक्यातील होसूर, कौलगे परिसरात धुडगूस घालणाऱ्या हत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांतून होत आहे. शिवारातील ऊस, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. भरदिवसा रस्त्यावर, शिवारात आणि गावातही हत्ती वावरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनखाते कोणती भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वनखात्याशी संपर्क साधून हत्तीचा बंदोबस्त करणार

हत्तीचे पहाटे अलतगानजीक दर्शन झाले होते. त्यानंतर हा हत्ती बेकिनकेरे गावाजवळ पोहोचला होता. हत्तीला डोंगर परिसरात पिटाळून लावण्यात आले आहे. नागरिकांनी आणि तरुणांनी हुल्लडबाजी करू नये. कोणीही दगड, पाणी किंवा इतर साहित्याने डिवचू नये. महाराष्ट्र वनखात्याशी संपर्क साधून हत्तीचा बंदोबस्त केला जाणार आहे.

-पुरुषोत्तम रावजी (आरएफओ)

कंग्राळी बुद्रुक परिसरात बघ्यांची एकच गर्दी : वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

कंग्राळी बुद्रुक  : उचगाव, बसुर्ते भागात बुधवारी आढळलेला हत्ती शुक्रवारी पहाटे कंग्राळी बुद्रुक परिसरात निदर्शनास आल्यामुळे नागरिक व शेतकरीवर्गाची घाबरगुंडी उडाली. हत्ती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. वन विभाग कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हत्ती आल्याबाबत सावधानता मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. कंग्राळी बुद्रुकवासियांना शुक्रवारी जंगली हत्ती अगदी जवळून पाहता आला. शुक्रवारी पहाटे 5 वाजता शाहूनगरमार्गे कंग्राळी बुद्रुक गावाजवळील बाहेर गल्लीला लागून असलेल्या शिवारामध्ये नागरिकांना हत्ती निदर्शनास आला. यानंतर वैभवनगरकडे हत्तीने कूच केली.

वैभवनगर परिसरातील दुचाकीची मोडतोड

नागरी वस्तीमध्ये हत्ती घुसू नयेत म्हणून वन विभागाचे कर्मचारी जातीने लक्ष देत असल्याचे दिसून येत होते. फटाके, बाँब फोडून नागरिकांना सावध करत होते. परंतु वैभवनगर परिसरामध्ये हत्तीने घरासमोर लावलेली एक दुचाकी सोंडेने उचलून खाली आपटली. तसेच एका घराचे समोरील गेटही तोडल्याचे सांगण्यात आले. यानंतर अरण्य विभाग कर्मचाऱ्यांनी हत्तीला कंग्राळी बुद्रुकच्या पश्चिम बाजूकडील शिवाराकडे हुसकावत आणले.

हत्तीला अलतगा शिवाराकडे नेले

वन कर्मचारीवर्गाने शेतातील कडधान्य पीक किंवा जोंधळा पिकाचे हत्तीकडून नुकसान होणार नाही याबाबत सतर्कता बाळगल्याचे दिसून आले. सदर हत्तीला करल शिवार, पालकीपट्टी, नारायण गावडे पट्टी, मार्कंडेय नदीकाठ अलतगा फाटा बंधाऱ्यावरून अलतगा शिवाराकडे नेण्यात आले. यानंतर आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, उचगाव शिवारातून बेकिनकेरे, बसुर्ते गावाजवळील जंगलमय भागात हत्तीला नेऊन सोडणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

वन विभाग कर्मचाऱ्याची कार्यतत्परता वाखाणण्याजोगी

हत्ती पुढे अन् वन कर्मचारी हत्तीच्या मागे असे चित्र पहावयास मिळाले. हत्ती शिवारातून जाताना कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वांना आरडाओरड करून फटाके-बाँब लावून सावध करत होते. तसेच काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्तीजवळ न जाण्याचे नागरिकांना सांगून सतर्क राहण्याबाबत आवाहन केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article