ध्रुव-तनिशा उपउपांत्यपूर्व फेरीत
एचएस प्रणॉय, रोहन कपूर-रुत्विका यांचेही विजय
वृत्तसंस्था / पॅरिस
भारताची बॅडमिंटनमधील मिश्र दुहेरीची जोडी ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो यांनी येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्यांनी आयर्लंडच्या जोडीवर सरळ गेम्सनी मात केली. पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयने विजयी सुरुवात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
16 व्या मानांकित ध्रुव-तनिशा यांनी आयर्लंडच्या जोशुआ मॅगी व मोया रेयान यांच्यावर 21-11, 21-16 अशी केवळ 35 मिनिटांत मात केली. त्यांची पुढील लढत पाचव्या मानांकित हाँगकाँगच्या टँग चुन मान व त्से यिंग सुएत यांच्याशी होणार आहे. ध्रुव-तनिशा यांनी प्रारंभापासूनच या लढतीवर वर्चस्व राखले होते. 6-2 अशी आघाडी घेतल्यानंतर ब्रेकवेळी ती 11-6 अशी केली होती. आयर्लंडच्या जोडीला अजिबात संधी न देता त्यांनी पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही हीच स्थिती राहिली. भारतीय जोडीने 7-2 अशी झटपट आघाडी घेतल्यानंतर रॅलीजवर नियंत्रण ठेवत फारसे त्रास न घेता हा गेम जिंकून सामनाही जिंकला.
पुरुष एकेरीत 2023 मध्ये कांस्य मिळविलेल्या एचएस प्रणॉयने फिनलँडच्या जागतिक क्रमवारीत 47 व्या स्थानावर असणाऱ्या जोआकिम ओल्डॉर्फचा 47 मिनिटांच्या खेळात पराभव केला. प्रणॉयची पुढील लढत दुसऱ्या मानांकित अँडर्स अॅन्टोनसेनशी होणार आहे. मिश्र दुहेरीत रोहन कपूर व रुत्विका शिवानी ग•s यांनीही पहिली फेरी पार करताना मकावच्या लिआँग लोक चाँग व एनजी वेंग ची यांच्यावर 18-21, 21-16, 21-18 अशी मात केली. ही लढतही 47 मिनिटे रंगली होती.