'रोड सेफ्टी' हिरो बना
कोल्हापूर :
अपघातात वेळेत मदत मिळाल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. यासाठी रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेऊन वैद्यकीय उपचार मिळवून देणाऱ्या व्यक्तीला जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिक्रायांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग व पॉलीटेक्नीक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी ही माहिती दिली. रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा आणि रोड सेफ्टी हिरो बना असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, रस्ता सुरक्षेबाबत प्रत्येकाला माहिती असते. तरीही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होते. रस्ते अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागत असून रस्ता सुरक्षेत हयगय ही न सुधारता येणारी चूक ठरते. यासाठी रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती घेण्याबरोबरच या नियमांचे प्रत्येकाने पालन करायला हवे. हेल्मेटचा वापर करु, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळणे असे वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षेचा संकल्प करुया
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्यू होण्यात 18 ते 35 वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त आहे. हेल्मेट न वापरणे, वेगाने वाहन चालवणे, समोरुन येणाऱ्या वाहनाचा प्रकाश, सीट बेल्ट न वापरणे, व्यसन अथवा अंमली पदार्थांचे सेवन करुन गाडी चालवणे अशा कारणांमुळे अपघाती मृत्यू वाढत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. रस्त्यावर अपघात झाल्यावर वेळेत मदत न मिळू शकल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सध्या दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढत असून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याचे सांगितले. यावेळी स्वागत प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी तर सूत्रसंचालन प्रा.राज अलास्कर यांनी केले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे आदी उपस्थित होते.