For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धोनीचे शेर, केकेआरसमोर ढेर!

06:58 AM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
धोनीचे शेर  केकेआरसमोर ढेर
Advertisement

चेन्नईचा सलग पाचवा पराभव : सामनावीर सुनील नरेनची अष्टपैलू खेळाडू

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

चेन्नईचा कर्णधार बदलला पण नशिब मात्र बदलले नाही. चेन्नईच्या कर्णधारपदी महेंद्रसिंग धोनी आला खरा, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला घरच्या मैदानात लाजिरवाणा पराभव यावेळी पत्करावा लागला. केकेआरने या सामन्यात चेन्नईवर 8 विकेट्स आणि 59 चेंडू राखत दणदणीत विजय साकारला. सुनील नरेन या सामन्यात केकेआरसाठी मॅचविनर ठरला.

Advertisement

चेन्नईचे मैदान धोनीचे होते पण निर्णय मात्र अजिंक्य रहाणेचे योग्य ठरत होते. सुरुवातीला अजिंक्यने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली. हा अजिंक्यचा निर्णय योग्य ठरला. कारण केकेआरने यावेळी चेन्नईला 103 धावांत रोखले. होम ग्राऊंडवर चेन्नईचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य केकेआरने 10.1 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यातच पेकेआरने पूर्ण करत दणकेबाज विजय मिळवला.

चेन्नईचे शेर, केकेआरसमोर ढेर

डेव्हॉन कॉनवे-रचीन रवींद्र जोडीने सावध सुरुवात केली. मात्र चेन्नईच्या 16 धावा असताना ते दोघेही बाद झाले. कॉनवेला 12 धावांवर मोईन अलीने तंबूचा रस्ता दाखवला तर रविंद्र 4 धावा काढून बाद झाला. यानंतर विजय शंकर आणि राहुल त्रिपाठी यांची जोडी जमली. विजय शंकरला दोन जीवदानही मिळाली. ही जोडी मैदानात जमेल असे वाटत असताना वरुण चक्रवर्तीने विजय शंकरला 29 धावांवर बाद केले तर सुनील नरिनने राहुलला त्रिफळाचीत केले. यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातलं. रवीचंद्रन अश्विन (1), रवींद्र जडेजा (0), इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला दीपक हु•ा (0) यांनी निराशाच केली. महेंद्रसिंग धोनीकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या पण तोही नरिनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. धोनीने एका धावेचे योगदान दिलं. शिवम दुबेने एकाकी लढा देत नाबाद 31 धावांची खेळी केली. दुबेच्या खेळीमुळे चेन्नईने कशीबशी शंभरी पार केली. कोलकातातर्फे नरिनने 13 धावांत 3 तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या.

केकेआरचा सहज विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना, केकेआरने डिकॉक आणि नरेन यांच्या मदतीने चांगली सुरुवात केली आणि दोन्ही फलंदाजांनी 25 चेंडूत 46 धावा केल्या. पण, कंबोजने केकेआरला पहिले यश मिळवून दिले आणि डिकॉकला आऊट केले. डिकॉक 16 चेंडूत 3 षटकारांसह 23 धावा काढल्यानंतर बाद झाला. यानंतर, नरेनने आक्रमक खेळी केली आणि केकेआरचा स्कोअर काही वेळातच 85 धावांवर पोहोचला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या नरेनला नूर अहमदने क्लीन बोल्ड केले. नरेनने 18 चेंडूत 2 चौकार व 5 षटकारासह 44 धावांचे योगदान दिले. यानंतर रिंकू सिंग मैदानात आला, त्याने कर्णधार अजिंक्य रहाणेसह संघाला विजय मिळवून दिला. रहाणे 20 तर रिंकू सिंग 15 धावांवर नाबाद राहिला. केकेआरने विजयी लक्ष्य 10.1 षटकांतच पूर्ण करत यंदाच्या हंगामातील तिसरा विजय संपादन केला.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकांत 9 बाद 103 (रचिन रविंद्र 4, डेव्हॉन कॉनवे 12, राहुल त्रिपाठी 16, विजय शंकर 29, शिवम दुबे नाबाद 31, सुनील नरेन 13 धावांत 3 बळी, हर्षित राणा व वरुण चक्रवर्ती प्रत्येकी दोन बळी, मोईन अली, वैभव अरोरा एकेक बळी)

केकेआर 10.1 षटकांत 2 बाद 107 (डिकॉक 23, सुनील नरेन 44, अजिंक्य रहाणे नाबाद 20, रिंकू सिंग नाबाद 15, अंशुल कंबोज व नूर अहमद प्रत्येकी एक बळी).

 चेन्नई आयपीएलमधून बाहेर?

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 6 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि पॉइंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. त्यांना आणखी 8 सामने खेळायचे आहेत, पण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना किमान 7 सामने जिंकावे लागतील. सध्या तरी हे चित्र कठीण असे दिसत आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधून जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.

Advertisement
Tags :

.