चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या चार ‘इव्हेंट अॅम्बेसेडर’मध्ये शिखर धवन
वृत्तसंस्था/ दुबई
पाकिस्तान आणि दुबई येथे 19 फेब्रुवारी ते 9 मार्चदरम्यान होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या चार इव्हेंट अॅम्बेसेडरमध्ये बुधवारी भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनची निवड करण्यात आली.
धवनच्या व्यतिरिक्त आयसीसीने 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदी यांनाही इव्हेंट अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. हे चौघे अतिथी स्तंभ लिहितील आणि सामन्यांनाही उपस्थित राहतील तसेच या स्पर्धेबद्दल त्यांचे विचार मांडतील. या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम आठ संघ स्पर्धा करतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग बनणे ही एक खास भावना आहे आणि आगामी स्पर्धेचा अॅम्बेसेडर म्हणून आनंद घेण्याची संधी मिळणे हा एक सन्मान आहे, असे धवनने आयसीसीच्या निवेदनात म्हटले आहे. धवन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून दोन स्पर्धांमध्ये त्याने 701 धावा काढल्या. त्यामुळे धवन हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक आहे. स्पर्धेत सलग दोन गोल्डन बॅट्स (सर्वाधिक धावा करणारा फलंदाज) जिंकणारा एकमेव खेळाडू ठरण्याचा मानही त्याच्याकडे आहे.
2013 च्या स्पर्धेत स्पर्धावीर म्हणून त्याची निवड झाली होती तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रमही धवनकडे आहे. ‘माझ्या काही सर्वांत प्रिय क्रिकेट आठवणी चॅम्पियन्स ट्रॉफीशी निगडीत आहेत. येत्या आठवड्यापासून आपण जगातील सर्वोत्तम संघ प्रत्येक सामन्यात त्यांचे सर्वस्व पणाला लावताना पाहणार आहोत, असे धवनने म्हटले आहे.
पाकिस्तानला या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याने सर्फराज आनंदित आहे. भारत दुबईमध्ये त्यांचे सामने खेळणार आहे. 2017 मध्ये पाकिस्तानचा कर्णधार म्हणून पांढरे जॅकेट परिधान करून ट्रॉफी उंचावण्याचा अनुभव किती खास होता हे मी कधीही विसरणार नाही. ही स्पर्धा क्रिकेट कॅलेंडरमध्ये परतल्याचे पाहून आणि माझ्या देशाला अशा खास स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याने मला आनंद झाला आहे, असे त्याने म्हटले आहे.
टिम साउदी आणि वॉटसन यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. आघाडीचे आठ संघ प्रतिष्ठित किताबासाठी आमनेसामने येणार असल्याने आम्हाला पुढील तीन रोमांचक आठवड्यांमध्ये असाधारण आणि जिंकू किंवा मरू पद्धतीने खेळलेले क्रिकेट पाहायला मिळेल, असे वॉटसनने म्हटले आहे.