धर्मनाथ सर्कल-सुभाषनगर पदपथ अतिक्रमण मुक्त
वाहतूक पोलीस-मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून खडेबाजार रोडवरही पुन्हा कारवाई : पदपथांनी घेतला मोकळा श्वास
प्रतिनिधी / बेळगाव
बाजारपेठेसह उपनगरात रस्ते आणि पदपथावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सोमवारी धर्मनाथ सर्कल आणि सुभाषनगर येथे पदपथावर व्यापार करणाऱ्या फेरीवाल्यांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून हटविण्यात आले. त्यामुळे पदपथांनी मोकळा श्वास घेतला आहे.
गेल्या महिन्याभरापासून वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून संयुक्तरीत्या बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविले जात आहे. गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, खडेबाजार, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली त्याचबरोबर उपनगरातील देखील अतिक्रमण हटविले जात आहे. दररोज अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असली तरी व्यावसायिकांना अद्यापही शिस्त लागल्याचे दिसून येत नाही. कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी लगेच पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण केले जात आहे. सोमवारी सुभाषनगर येथील पोलीस मुख्यालयासमोरील पदपथावर थाटण्यात आलेले ज्यूस सेंटर, त्याचबरोबर नारळ विक्रेत्यांना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले. धर्मनाथ सर्कल येथील पदपथावरून चप्पल विक्रेते व इतर व्यावसायिकांना हटकण्यात आले. सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईनंतर पदपथांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले.

| गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कारवाई खडेबाजार रोडवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कारवाई केली जात असली तरी व्यापारी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करत व्यवसाय करत आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. सोमवारी सायंकाळी वाहतूक पोलीस व मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने खडेबाजार रोडवर पुन्हा कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले. |