धर्मस्थळ प्रकरण : तिमरोडींच्या हद्दपारीचा आदेश रद्द
बेंगळूर : धर्मस्थळमधील कथित शेकडो मृतदेह दफन प्रकरणात आरोप झालेल्या सामाजिक कार्यकर्ता महेश शेट्टी तिमरोडी यांना वर्षभरासाठी मंगळूर जिल्ह्यातून रायचूरला हद्दपार करण्याचा आदेश पुत्तूर साहाय्यक आयुक्तांनी दिला होता. हा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे तिमरोडी यांना आणखी एकदा दिलासा मिळाला आहे. हद्दपारीच्या आदेशाला महेश शेट्टी तिमरोडी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने पुत्तूर साहाय्यक आयुक्त स्टेल्ला वर्गीस यांनी हद्दपारीचा दिलेला आदेश रद्द केला. तसेच योग्य कारण, कलमांसह चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करावा, असा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला.धर्मस्थळ प्रकरण आणि सौजन्या हत्या प्रकरणात आंदोलन करणारे महेश शेट्टी तिमरोडी यांना मंगळूरमधून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश 20 सप्टेंबर रोजी पुत्तूरच्या साहाय्यक आयुक्तांनी दिला होता. तिमरोडी यांच्याविरुद्ध सुमारे 32 विविध प्रकरणे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याची मागणी झाली होती. आता उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द केला आहे.